
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। मांजरम प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत असलेल्या रातोळी येथील उपकेंद्रात एक ही कर्मचारी रहात नसल्याने आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजल्याची तक्रार रातोळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सह एका अन्य नागरिकाने केली आहे.

रातोळी उपकेंद्रा अंतर्गत रातोळी, कार्ला,टाकळी,माहेगाव ही चार गावे येतात. या ठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका दोन, आरोग्य सेवक एक अशी चार पदे असून रातोळी येथे जवळपास पाच हजार लोकसंख्या आहे.मनार नदी काठावरील ही गावे असल्याने अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.संसर्गजन्य आजाराचे रुग्ण नेहमी येत असतात, बाळंतपण, छोट्या मोठ्या गरजेच्या सेवा शासनानी उपलब्ध करून दिल्या आहेत.

परंतू कर्मचारी मुख्यालयी उपस्थित रहात नसल्याने या सेवे पासून नागरिक दुर आहेत.सर्व कर्मचारी जिल्ह्याच्या ठीकानावरून येणं जाणं करत असल्याच्या तक्रार वाढल्या आहेत.रातोळीच्या सरपंच सुमनबाई पिराजी देशमुख व सामाजिक कार्यकर्ते गजनान निवृतीराव पाटील यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊन सदरील कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करून आरोग्य सेवा सुरळीत करावी अशी मागणी केली आहे.

