
“ज्योतीने ज्योत पेटली
सावित्री झाली वात
रात्र काळोख भेदाया
केली तिने सुरुवात !”
3 जानेवारी 1831 मध्ये नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे सावित्रीबाईंचा जन्म झाला आणि स्त्री सक्षमीकरणाच्या प्रवासास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सावित्रीबाईचे व्यक्तिमत्व बहुरंगी ,बहुगुणी ,अष्टपैलू असे होते .त्यांनी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मोठ्या हिमतीने ,सचोटीने आणि जिद्दीने मात केले. भारतातील महिलांना हक्क मिळवून देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी महत्वपूर्णा भूमिका बजावली . जात आणि लिंगावर आधारित लोकांमधील भेदभाव व अन्यकारक वागणूक दूर करण्याचे काम ही त्यांनी केले .

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर गुलामगिरी विरोधात कार्य करणारे थॉमस क्लाक्सर्न यांचा प्रभाव पडलेला दिसून येतो क्लाक्सर्न यांचे जीवन चरित्र त्यांनी वाचले ज्यात अमेरिकेच्या आफ्रिकन गुलामांच्या जीवनाची संघर्षमय शोककथा छापली होती यातून त्यांना स्त्रीमुक्ती आणि अस्पृश्यता निर्मूलन या कार्याची प्रेरणा मिळाली.

सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांच्या उन्नतीसाठी, सबलीकरणासाठी महाराष्ट्रातच नाही तर भारतात काम करणारी पहिली संघटना महिला सेवा मंडळ स्थापन केली. त्यात प्रौढ स्ञीयांचे शिक्षण, कुमारी माता,परित्याकत्या ,विधवा पुनर्विवाह, बालहत्या, जरठकुमारी विवाह, अस्पृश्यता निवारणाच्या समस्या इत्यादी विषयांवर चर्चा होत असे. स्त्रीयांना आपल्या समस्या मांडण्यास व त्यांना बोलके करण्यास सावित्रीबाई कारणीभूत होत्या म्हणूनच त्यांनी स्त्री मुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या असे त्यांना म्हटले जाते.

एखाद्या विधवेचे अज्ञातपणाने वाकडे पाऊल पडून गरोदर राहिली तर तिने बालहत्या प्रतिबंध गृहात जाऊन गुपचूप बाळंत होऊन जावे अशा प्रकारचे जाहिरात करणे केवढे असामान्य धैर्य ते असामान्य धैर्य सावित्रीबाईंनी केले आणि आशा स्त्रीयांसाठी बालहत्या प्रतिबंधात्मक गृहाची स्थापना महाराष्ट्रात केली. जे देशातील पहिले बालहत्या प्रतिबंधात्मक गृह आहे .बालहत्या ,बालविवाह थांबवण्यासाठीचे कार्य जे महिला व बालविकास आयुक्तालयाच्या माध्यमातून आज केले जाते ते केंव्हाच महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले यांनी सुरू केले होते. कारण त्या काळात बाल विधवांची केविलवाणी अवस्था झाली होती. बालविवाह झाल्यामुळे स्त्रीया तरुणवयात मोठ्या संख्येने विधवा होत असत आणि समाजात विधवा महिलेला पुनर्विवाह करण्यास मनाई होती. त्यामुळे विधवा स्त्रीयांना अपमानित जीवन जगावे लागत असे.

त्याचबरोबर हिंसाचार ,छळ आणि बलात्काराच्याही त्या बळी जात असत अशावेळी तत्कालीन स्त्रीयांना समाजात ना इज्जत होती ना विधवा पुनर्विवाह करण्याची मान्यता होती. त्यामुळे त्या आत्महत्येचे पाऊल उचलत असत त्यामुळे तत्कालीन समाज व्यवस्थेत स्त्री आत्महत्येचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात होते .आणि या सर्व स्त्रीयांच्या समस्या सोडवण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी 28 जानेवारी 1853 रोजी महात्मा फुले यांचे मिञ उस्मान शेख यांच्या घरी बालहत्या प्रतिबंधात्मक गृहाची स्थापना केली आणि स्त्रीयांना सन्मानाने जीवन जगण्याची वाट मोकळी करून दिली.

ज्या समाजातून व ज्या परिस्थितीतून मुले -मुली येतात त्याचा बरा- वाईट परिणाम संबंधित मुला- मुलींच्या शिक्षणावर होत असतो कारण उच्च वर्णातील शिक्षक हे शूद्र जातीतील मुलांना जवळ करत नसतील तर त्याचा परिणाम समाजातील अशा मुलांच्या मनाचे खच्चीकरण करणारे ठरते म्हणून ज्या समाजातील मुले त्याच समाजाचा शिक्षक असावा असेल हा मानवशास्त्रीय सिद्धांत सावित्रीबाई यांनी मांडला. हा सिद्धांत सावित्रीबाई फुले यांनी 1863 ला मांडला जो आज सर्वसामान्य झाला आहे.

सावित्रीबाई फुले या स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या आद्य प्रणेत्या होत्या. स्त्रीयांना अज्ञान व गुलामी यातून मुक्त करण्यासाठी व सनातनी समाजाविरुद्ध लढण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. स्त्री ही माणूस आहे आणि तिला माणुसकीचे हक्क मिळालेच पाहिजेत ही जाणीव त्यांना करून देण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले .स्त्रीयांना स्वतःच्या पायावर उभे करण्याची कामे त्यांनी सुरू केली. बालवयात पिता, तरुणपणी नवऱ्याच्या धाकात व म्हातारपणी मुलाच्या धाकात स्त्रीने राहिले पाहिजे ती स्वतंत्र राहण्यास पात्रच नाही अशी मनुस्मृतीवर आधारित पुरुष प्रधान संस्कृतीतील सामाजिक धारणा होती ती धारणा मोडीत काढत त्या काळात स्त्रीला शिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्याचे ऐतिहासिक काम सावित्रीबाई फुले यांनी केले.
हजारो वर्षापासून भारतीय स्त्री जीवन धर्मसंस्थेच्या जाचक, अन्यायकारी रूढींनी ग्रासलेले होते जे सावित्रीबाई फुले यांच्या अथक परिश्रमाने तोडले गेले व भारतीय स्त्री जीवनाने मोकळा श्वास घेण्यास वाटचाल सुरू केली. सामाजिक दबाव , उपेक्षा ,असंख्य संकटे या सर्वांवर मात करून सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांमध्ये आत्मभान जागे केले त्यांचे कार्य भारतीय स्त्री जीवनात मोलाचा दगड ठरले आहे .जाती आणि लिंगावर आधारित लोकांमधील भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक या सर्व गोष्टींना फटकारा देण्यासाठी त्यांनी कृतीयुक्त कामास सुरुवात केली.
तसेच सावित्रीबाई फुलेंनी तत्कालीन समाज व्यवस्थेत अस्तित्वात असलेली केशवपण प्रथा मोडून काढण्यासाठी नाभिक समाजाशी संवाद साधून विधवा महिलांच्या केशवपण समस्येविरुद्ध आंदोलन उभे केले.पित्तृसत्ताक समाज व्यवस्था आणि स्त्री विरुद्ध रुढीपरंपरे विरुद्ध असलेल्या जाचक अटींवर विरूध्द त्यांनी आवाज उठवला आणि महिलांना सन्मानाने जगण्याची संधी मिळवून दिली. स्त्रीयांना केस कापून एका कोंडवाड्यात विद्रूप जीवन जगावे लागत असे अशा स्त्रीयांवर होणाऱ्या अन्यायाचे वर्णन त्यांनी आपल्या काव्यातूनही केलेले दिसून येते ” रूप तियेचा करी विच्छन
नकोसे केले तिजला त्याने…..शोषून काढीत मध तियेचा…..चिपाड केले तिला तयाने…. ” त्याचबरोबर सावित्रीबाई यांनी सती प्रथा रोखण्यासाठी पुनर्विवाह प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसून येतात म्हणूनच त्यांचा भारतातील पहिल्या स्त्रीवादी विचारवंत सुधारक म्हणून गौरव केला जातो.
1892 मध्ये महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे म्हणून त्यांनी महिला सेवा मंडळ स्थापन केले .ज्यामध्ये महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे सुरू केले जेणेकरून महिला आत्मनिर्भर होऊ शकतील.1896 च्या दुष्काळात सावित्रीबाई फुले यांनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला पोटासाठी शरीर विक्रीय करणाऱ्या बाया बापड्यांना दुष्टांच्या चावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबात आश्रयास पाठवले .त्यांच्या या कार्यास हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी स्त्रीयांच्या मदतीसाठी हात पुढे केला .
महिला शिक्षणाविषयी त्या आग्रही होत्या त्यांच्या मते महिला शिक्षित झाल्या तर समाजात परिवर्तन घडवून येईल असा त्यांचा विश्वास होता त्यामुळे त्यांनी या कार्याच्या संदर्भात पुढाकार घेत 1 जानेवारी 1848 मध्ये पुणे येथे महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यास ज्योतिराव फुले यांनी प्रोत्साहन देत सहकार्य केले सावित्रीबाई फुले यांच्या या कार्यामुळे त्यावेळी धर्म बुडाला अशी समाजात ओरड सुरू झाली धर्म मार्तंडांनी सावित्रीबाई फुल्यांना हे कार्य करत असताना शेण, माती, दगड फेकून मारण्याचे सुद्धा कार्य केले .त्यांच्या शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न केला परंतु सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा वसा अविरतपणे जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालूच ठेवला. 1 जानेवारी 1848 ते 1852 पर्यंत त्यांनी एकूण 18 शाळा काढल्या.
पशु आणि महिलांना फक्त फटाक्यांची भाषा समजते किंवा फटके दिले पाहिजे एवढाच त्यांचा अधिकार आहे असे मानणारी मनुवादी व्यवस्था त्या काळात होती. स्त्रीयांना केवळ उपभोगाची वस्तू म्हणून बघितले जात होते आणि या सर्व गोष्टींना फाटा देऊनच त्यांच्या उद्धाराचेे कार्य सावित्रीबाई फुलेंनी केले. मनुचे प्रतिराज्य म्हणून संबोधले गेलेल्या पेशवाईचा अंत झाला असला तरी समाजावरील त्याची पकड कायम होती आणि ती पकड दूर करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी अहोरात्र कार्य केल्याचे दिसून येते.
हजारो वर्षापासून भारतीय स्त्री जीवनावर धर्मसंस्थेने जाचक मानवी बंधने घातली होती जी सावित्रीबाई फुले यांच्या अथक परिश्रमाने तोडली गेली व भारतीय स्त्री जीवनाने मोकळा श्वास घेण्याची वाटचाल सुरू केली. सामाजिक दबाव ,उपेक्षा ,असंख्य संकटे या सर्वांवर मात करून सावित्रीबाईनी स्त्रीयांचे आत्मभान जागे केले. त्यांचे कार्य स्त्री जीवनात मोलाचा दगड ठरल्याचे दिसून येते. आज पुन्हा स्ञीस संस्कृतीच्या बेड्यात समाजाचे अडकवणे सुरू आहे त्यामुळे पुन्हा सावित्रीबाईच्या कार्याची आज गरज निर्माण झाली आहे.
“जेरीचे शत्रूला करुनी बेफाम चढाई…. ताराबाई माझी मर्दानी भासे… चंडिका रणरागिनी रणदेव ती श्रद्धास्थाने नमन माझे…. हे तिच्या चरणी “या सावित्रीबाई फुले यांच्या कवितेतून त्यांचा प्रखर स्त्रीवाद आपणास लक्षात देतो अशा प्रकारच्या स्त्रीवादाची पुन्हा एकदा समाजाला गरज निर्माण झाली आहे कारण समाजात रोज अनेक स्त्रीया आजही असंख्य समस्यांना सामोरे जात असताना आढळून येतात. बलात्कार, खून, छेडछाड, छळ, हिंसाचार यासारख्या अनेक समस्यांना आजची स्त्री रोज सामोरे जाताना आढळून येते.अशा या स्ञी उद्धारक क्रांतीज्योतीस कोटी कोटी प्रणाम!
…डॉ.सत्यभामा जाधव, सद्स्या बाल कल्याण, समिती नांदेड, मो.नं:-9403744715
