
नांदेड। शहरातील नंदीग्राम सोसायटी मधील राहिवासी श्रीमती लक्ष्मीबाई अशोक हातागळे ह्या विधवा असून अनुसूचित जाती पैकी आहेत. त्या अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या हिंगोली नाका युनिटच्या उपाध्यक्षा आहेत. त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या पोलीस विभागात कार्यरत असलेल्या सुनीता यांच्या आई श्रीमती रुख्मिनबाई हरिश्चंद्र सूर्यकर यांचे घर हातागळे यांच्या घरा शेजारी आहे.कचरा टाकण्याच्या कारणावरून सूर्यकर कुटुंबीय अर्जदारस नेहमीच जातीवाचक शिवीगाळ करीत असतात. परंतु वाद वाढू नये यासाठी लक्ष्मीबाईनी अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत.

दि.१७ डिसेंबर रोजी कचरा टाकण्यावरून सूर्यकर आणि हातागळे यांचा वाद झाला आणि पोलीस स्थानक विमानतळ येथे फिर्यादी लक्ष्मीबाई हातागळे आणि त्यांचा मुलगा मंगेश हातागळे हे तक्रार अर्ज देण्यासाठी गेले असता पोलीस कॉन्स्टेबल सुनीता यांनी विमानतळ पोलीस स्थानकात काहीएक विचार न करता मंगेश याला बेदम मारहाण केली आहे.

मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून दिनांक १७ डिसेंबर रोजीचे फुटेज तपासून मारहाण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी यासाठी आणि जीवाला धोका असल्यामुळे मोफत पोलीस संरक्षण देण्याची मागणी घेऊन जनवादी महिला संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आणि अमरण उपोषण दि.२ जानेवारी पासून सुरु करण्यात आले आहे.

मारहाण करणारी महिला पोलीस कर्मचारी नेहमीच म्हणत असते की मी एसपी,आयजी यांना घाबरत नाही. माझे आमदार,खासदार आणि गुंडासोबत चांगले व जवळचे संबंध आहेत. जास्त हुशारी केलीच तर खोटे गुन्हे दाखल करून तडीपार करून टाकेन.असे फिर्यादीच्या अर्जात नमूद आहे.

संबंधित महिला पोलीस खुपच घातक असून आपल्या पदाचा गैरवापर करीत आहे.यामुळे पोलीस खात्याची बदनामी होत आहे.त्यांची सखोल आणि
योग्य चौकशी करावी.संबंधित सूर्यकर कुटूंबीय आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून अर्जदार यांना धोका आहे. त्या गैर अर्जदारावर ऍट्रॉसिटी आणि बडतर्फ करण्याची कारवाई करावी म्हणून उपोषण आणि धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

या मध्ये उपोषणार्थी कॉ. लक्ष्मीबाई हातागळे आणि कॉ.लता गायकवाड यांचे उपोषण आहे तर त्यांना पाठिंबा देत जिल्हा निमंत्रक कॉ.करवंदा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सविता गायकवाड, कविता वाहुळकर, लक्ष्मीबाई केदारे यांच्यासह अनेक महिला धरणे आंदोलनामध्ये सामील झाल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या विजया काचावर यांनी पाठिंबा दिला असून त्या पीडित महिलांच्या सोबत आहेत.

