Friday, March 31, 2023
Home Uncategorized विद्येची देवता सावित्रीबाई फुले -NNL

विद्येची देवता सावित्रीबाई फुले -NNL

by nandednewslive
0 comment

भारत देश हा संतांचा महनतांचा तसेच समाजसुधारकांचा देश म्हणून ओळखला जातो. या देशात जेव्हा जेव्हा महिला,शिक्षण,संस्कृती अशा विविध विषयावर चर्चा करण्यात येते तेव्हा शूररागिणी जिजाऊबाई,राणी लक्ष्मीबाई शिक्षण तज्ञ सावित्रीबाई फुले कवयित्री बहिणाबाई चौधरी अशा कितीतरी महिला समाज सुधारकांची नावे समोर येतात. यापैकी भारतातील पहिली स्त्री शिक्षिका तथा भारतीय समाज सुधारक शिक्षण तज्ञ सावित्रीबाई फुले यांची आज जयंती या निमित्ताने त्यांनी भारतीय समाजाला दिलेल्या मौल्यवान योगदानाची मांडणी करावीशी वाटते सावित्रीबाई फुले भारतातील महिलांच्या हक्काबरोबरच शिक्षणासाठी बजावलेली भूमिका सदर लेखातून मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.

थोर महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यावेळी मागासवर्गीय मुलींना शाळेत शिकण्याचा अधिकारच नव्हता. अठराव्या शतकाच्या शेवटी आणि एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला पेशवाईचा काळ होता. शूद्र- अतिशूद्र अशी अत्यंत भयान परिस्थिती होती. पेशवे आणि सरदार यांच्या गैरवर्तनामुळे स्त्रियांना समाजात राहणे अशक्य होते. मुला मुलींची लग्न बालवयातच पाळण्यामध्ये लावण्याची रूढी परंपरा होती. अशा परिस्थितीत सावित्रीबाईंना कोणत्याच शाळेत पाठविण्याचा प्रश्नच नव्हता. खरंतर पेशवाईचा काळ हा स्त्रियांसाठी मरण यातना देणारा काळ होता. तेव्हा पेशवाईचा काळाकुट्ट अंधकार दूर करण्यासाठी महान समाज सुधारक पुरुष आणि स्त्री चा जन्म झाला. ते महान समाज सुधारक म्हणजे फुले दांपत्य होय.
सावित्रीबाई फुले यांच्या काळात पेशवाईने घातलेल्या धुमाकूळामुळे व रुढीपरंपरेच्या बंधनामुळे सावित्रीबाई फुले यांचे वयाच्या नव्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्या समवेत सन 1840 मध्ये विवाह झाला.

• सावित्रीबाई फुले यांचा शिक्षणक्रम :-
पेशव्यांच्या राजवटीत शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यांच्यासाठी शाळा नव्हत्या यामुळे सावित्रीबाईंना शिक्षणाचा कसलाच गंधही नव्हता शाळेचे तोंड पाहण्याचा कधी योग आलेला नव्हता त्या कठीण काळात इंग्रजांनी गोऱ्या लोकांसाठी शाळा सुरू केल्या असल्या तरी पेशवे शाही मुळे शूद्रांना शाळेत प्रवेश नव्हता अशा परिस्थितीत जोतीराव फुले यांना तिसऱ्या वर्गात असताना ब्राह्मणांच्या दबावामुळे शिक्षण सोडावे लागले. आणि सगुणाबाई व गोविंदराव यांचे मित्र त्यांच्या पुढाकाराने जोतीराव फुले यांना स्कॉटिश मिशनच्या इंग्रजी शाळेत शिक्षणास सुरुवात झाली. शिक्षण घेत असताना जोतिराव फुले वडिलांना शेतीकामात मदत करीत असत दुपारच्या वेळी शाळेत काय शिकवले ते जोतिराव सावित्रीबाईंना वाचून दाखवत. जोतीराव फुले यांना नेहमी वाटायचे आपली पत्नी सावित्रीबाई ह्या शिकल्या पाहिजे. परंतु पुण्यातील ब्राह्मणांनी मुलींच्या शिक्षणासाठी प्रचंड विरोध केल्यामुळे सावित्रीबाईंना शिक्षण देणे शक्य नव्हते. अशावेळी जोती रावांन सावित्रीबाईंना शिकविण्याचा दृढ निश्चय केला खरा परंतु त्या काळातील रूढी परंपरेमुळे पती-पत्नीला घरात बोलण्याची सक्त मनाई होती. घरात शिकविण्यासाठी कसलीच संधी नव्हती.

अशा परिस्थितीत जोतिरावांनी शेतीचा उत्तम पर्याय निवडला. दररोज शेतात जाऊन सावित्रीबाई आणि मावस बहीण सगुणाबाई यांना जमिनीची पाटी करून बाराखडी शिकविण्यास सुरुवात केली. जमिनीवर झाडाच्या काडीचा उपयोग करून बाराखडी तर झाडांची पाने तोडून उजळणी शिकवली नंतर सावित्रीबाई यांना नॉर्मल स्कूलमध्ये प्रवेश देण्यात आला. पुढे सावित्रीबाई यांनी जिद्दीने अभ्यास करून अध्यापिकेची पदवी संपादन केली.

• विद्येची देवता सावित्रीबाई फुले
सन 1847 मध्ये सावित्रीबाई फुले यांनी अध्यापनाचे शिक्षण पूर्ण केले आणि भारतीय समाज व्यवस्थेत पसरविण्यात आलेल्या रूढीपरंपरेच्या काळोखातून सर्व समाजाला मुक्त करण्याचा निर्धार केला. तसेच पाखंडी जातीभेद करणाऱ्या पेशव्यांना आव्हान देत समाजाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. तत्पूर्वी जोतिराव फुले यांनी इंग्रज महिला मीस फॅरार यांनी गोऱ्या लोकांच्या मुलींसाठी अहमदनगर येथे सुरू केलेल्या शाळेत जाऊन तेथील कार्यप्रणालीचा सखोल अभ्यास केला. नंतर पुण्यामध्ये अशाच स्वरूपाची शाळा काढण्याचा निश्चय केला. ज्योतीराव फुले यांचे मित्र सदाशिव गावंडे यांच्या सहकार्याने पुण्यातील गंजपेठेत सण 1 जानेवारी 1848 रोजी मुलींची शाळा सुरू केली.

महात्मा जोतिराव फुले यांनी सुरू केलेली पहिली मुलींची शाळा ही भारतीय लोकांसाठी शिक्षणाचा क्रांतिकारी दिवस ठरला. या शाळेतील मुलींना शिक्षण देण्याचा पहिला बहुमान समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांना मिळाला. येथूनच खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांच्या क्रांतीपरवाला सुरुवात झाली. पुण्यात सुरू केलेल्या शाळेत पहिल्याच दिवशी सहा मुलींनी प्रवेश घेतला. त्यामध्ये चार ब्राह्मण, एक मराठ,एक धनगर अशा मुलींनी शैक्षणिक ज्ञान घेण्याची सुरुवात केली.

पुण्यामध्ये मुलींची शाळा सुरू झाली असून सावित्रीबाई फुले या शिक्षिका आहेत असे सनातनी ब्राह्मणांना समजतात तळपायाची आग मस्तकाला गेली आणि पुण्यात ब्राह्मणांचा तांडव सुरू झाला. स्त्रीने शिक्षण घेणे म्हणजे पाप आहे. स्त्रियांच्या शिक्षणामुळे सात धर्म बुडेल व पृथ्वीवर पाप वाढवून पृथ्वीचा नाश होईल पृथ्वी बुडून जाईल देव आणि सर्व जातीचा विनाश होईल धर्म प्रमाणे स्त्रियांना शिक्षण घेण्याचा कोणताच अधिकार नाही असा फतवा काढून दहशत पसरविण्यात आली. एवढ्यावरच ते थांबले नाही. सावित्रीबाई फुले शाळेत जाताना व येताना जीवे मारण्याची धमकी देण्याबरोबरच दगड शेण याचा मारा करू लागले. सावित्रीबाई यांना दररोज अनेक संकटांचा सामना करावा लागत असे. अशी अनेक संकटे समोर आले तरी सावित्रीबाई ह्या कधीच डगमगल्या नाही त्यांची ऊर्जा दररोज जोमाने वाढत होती. त्यातच एका वर्षात तब्बल 25 मुलींनी शाळेत प्रवेश घेतला होता. मुलींची वाढती संख्या आणि अज्ञानात कितपत पडलेल्या समाजाला सुधारण्यासाठी ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांनी सुमारे 18 शाळा सुरू केल्या. चार वर्षात पुण्यामध्ये जवळपास सात शाळा सुरू झाल्या. समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करत पहिली शाळा भिडे वाड्यात, दुसरी महार वाड्यात, तिसरी चिपळूण वाड्यात, चौथी नाना पेठेत, पाचवी रास्ता पेठ, सहावीवेताळ पेठेत, सातवी कसबा पेठेत सुरू केल्या त्याचबरोबर पुण्याबाहेर सुद्धा शाळा सुरू केल्या.

अशाप्रकारे शाळांचा विस्तार वाढत गेला आणि सावित्रीबाई फुले यांच्या कामाचाही व्याप वाढत गेला. शिक्षिका असणाऱ्या सावित्रीबाई मुख्याध्यापिका झाल्या. हे सनातनी ब्राह्मणांना न पचणारी गोष्ट होती. त्यांना हे पहावत नव्हते. ब्राह्मणांनी अनेक षडयंत्र रचली तरीही सावित्रीबाईंनी शिक्षणाचे पवित्र काम न थांबवता सुरूच ठेवले. ब्राह्मणांनी चारही बाजूंनी प्रयत्न करून देखील ते निष्प ठरले होते. तेव्हा ब्राह्मणांनी आडदांड माणसाला हाताशी धरून सावित्रीबाई यांना बेअब्रू करण्याची धमकी दिली तरीही त्या डगमगल्या नाही. सावित्रीबाई शाळेला जात असताना ब्राह्मणांनी सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकले हा सर्व प्रकार निमुटपणे सहन करत सावित्रीबाई सेनानी चिखलाने माखलेली साडी शाळेत गेल्यानंतर काढून आपल्या पिशवीतील दुसरी साडी नेसत. एकदा तर कहरच झाला. सनातनी ब्राह्मणांनी पाठवलेल्या माणसाने सावित्रीबाई समोर आब्रूचा विषय काढला तेव्हा त्या इतक्या संतापल्या आणि त्या माणसाच्या थोबाडात फाड फाड थापडा मारताच त्याची बोबडी वळली. आणि येथूनच सावित्रीबाईंच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्या एक खंबीर महिला म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. नंतर कोणीही सावित्रीबाईंना त्रास देण्याची हिंमत केली नाही. म्हणूनच त्या खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांसाठी विद्येची देवता म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक कार्याची नोंद इंग्रज अधिकाऱ्यांनी घेतली आणि त्यांचा सत्कार समारंभ पुण्यात विश्राम बागेजवळ करण्याचे ठरले या सत्कार समारंभासाठी पुण्यातील विद्वान मंडळी जसे की कलेक्टर, प्रोफेसर, ब्रिटिश सरकारच्या विविध खात्यातील अधिकारी यांच्या उपस्थितीत मेजर कँडी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभ प्रसंगी म्हणाले सावित्रीबाईंनी मिशनरी पद्धतीने स्त्रियांची सेवा केली विरोधकांचा विरोध सहन करत जिद्दीने कार्य चालू ठेवले त्यांच्या या धाडसी कार्याला भारतीय इतिहासात तोड नाही. इंग्रज सरकारकडून सन्मान प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय शिक्षक आहे म्हणून त्यांना विधीची देवता म्हणणे योग्य आहे.

सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे खुले करून गोरगरीब मुला-मुलींना शिक्षण घेण्यासाठी वस्तीग्रह सुरू केले. अस्पृश्य समाजासाठी पाण्याचा हौद खुला केला. पेशव्यांच्या काळात महिलांवर प्रचंड अत्याचार व्हायचे. महिलांची बालपणीच लग्न लावून दिल्यामुळे एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाले तर ती तरुण वयातच विधवा होत असे. विधवा महिलेचे मुंडन करून विद्रूप केले जात असे. अशातच घरातल्या मोठ्या पुरुषांकडून विधवा महिलेवर अत्याचार करून बलात्कार सुद्धा केली जायचे. अशात ती महिला गर्भवती राहिली तर तिची अर्भक कचराकुंडीत फेकले जायचे. हा सर्व प्रकार थांबविण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक ग्रह व विधवा आश्रमाची स्थापना केली. सावित्रीबाईंनी नाभिक समाजाशी संवाद साधून विधवा महिलांचे केस कापण्या विरोधात आंदोलन केले. स्त्री-विरोधी रूढीपरंपरेविरुद्ध आवाज उठवला.

महिलांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी महिला सेवा मंडळ स्थापन केले. महिला स्वावलंबी बनाव्यात म्हणून कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू केले. अशा या बहुआयाम सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये प्लेग सातीसाच्या रोगाने धुमाकूळ घातला होता तेव्हा प्लेग रूपांसाठी दवाखाना सुरू केला होता. त्या दरम्यान सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली आणि त्यात त्यांची प्रकृती खालावत गेली व अखेर 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांचे दुःखद निधन झाले.

समारोप :
थोर समाज सुधारक तथा भारतातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी दलित महिलांना शिक्षित करण्याबरोबरच जातीवादी वर्ण भेदभावाविरुद्ध तीव्र लढा दिला उपेक्षित समाजाच्या उन्नतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण महिला आणि मागासवर्गीय यांच्या उन्नतीसाठी समर्पित आज भारत देश तंत्रज्ञानाच्या युगात महासत्ता बनत असला तरी सावित्रीबाई फुले यांच्या योगदानामुळे गगन भरारी घेत सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक विचार आजही भारत देशासाठी अत्यंत उपयुक्त आज स्पर्धेच्या काळात नवनवीन शैक्षणिक धोरण येत असले तरीही सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक धोरण विसरून चालता येणार नाही हे अधोरेखित आहे असेच म्हणावे लागेल.

…..लेखिका कांचन सोनकांबळे श्री निकेतन हायस्कूल नांदेड

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!