
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। भारतीय स्त्रीवादाची जननी, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका,एक शिक्षणतज्ञ, समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीराव फुले 3 जानेवारी यांचा जन्मदिवस.

या जन्मदिवसानिमित्त ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खैरगाव येथे शाळेच्या परिपाठाच्या वेळेत शाळेच्या प्राचार्य सौ. सरोज धरणे मॅडम व शाळेतील सर्व महिला शिक्षिका यांनी सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.

इयत्ता 2 री च्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या अत्यंत सुंदर अशा वेशभूषेत उपस्थिती दर्शवली.तसेच इयत्ता 1 ली ते 8 च्या या वर्गातील काही विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवना विषयी आपली मनोगते व्यक्त केली. शालेय परिपाठाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे “ज्ञानामृत” या सदरात शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री अर्जुन बैस सर यांनी महाभारतातील एका कथेचा संदर्भ देत ” स्त्री-शक्ती आणि तिचा सन्मान ” याविषयी आपले मत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

सौ. मीना बैस यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित एक अत्यंत सुंदर कविता सुरेख आवाजात सादर केली. शाळेच्या प्राचार्य सौ.सरोज धरणे मॅडम यांनी “सावित्रीबाई” आणि स्त्री शिक्षण याविषयी आपले सखोल असे मार्गदर्शन केले. यानिमित्त शाळेच्या सर्व महिला शिक्षिका यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. आणि अत्यंत उत्साहात या कार्यक्रमाची सांगता झाली.

