
नवीन नांदेड। कै.डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपुरी जलाशयात मुबलक पाणीपुरवठा असतानाही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व तांत्रिक बाबी पुढे करत शेतकरी बांधवांना पिकांसाठी पाणी मिळत नसल्याने आमदार हंबर्डे यांनी पाठपुरावा करत आधिकारी यांना धारेवर धरत यंत्रणा अलर्ट केली तेव्हा येत्या २ दिवसांत शेती पिकांना पाणी मिळेल असा विश्वास आ हंबर्डे यांनी दिला.


३ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता आ. मोहन अण्णा हंबर्डे यांनी विष्णुपुरी जलाशयाला भेट दिली. यावेळी पाटबंधारे उत्तर विभाग कार्यकारी अभियंता ए, एस,चौगुले, पंपगृह विभाग कार्यकारी अभियंता एम.आर. सुर्यवंशी, यांत्रिकी विभाग उप अभियंता नवनाथ पिसोटे,विद्युत उप अभियंता संतोष सुभेदार, उप अभियंता अरुण अंकुलवार समवेत अधिकारी यावेळी उपस्थित होते.


आजघडीला ४ पंप नादुरुस्त अवस्थेत आहेत त्या पंपाची तात्काळ दुरुस्ती लवकर करावी, पाईपांमधुन होत असलेली नासाडी थांबविणे गरजेचे, शेतकरी पाण्याविना चिंतेत आहे, शेतीपिकांना खते टाकल्याने पीके वाळत आहेत. त्याकरिता पाटबंधारे विभागाला जाग करत पाठपुरावा केला तेव्हा कार्यकारी अभियंता चौगुले यांनी येत्या २ दिवसात ढाकणी, पांगरा कालव्यातून पाणी दिले जाईल असा विश्वास आ. मोहन अण्णा हंबर्डे यांना दिला,उपसरपंच संतोष पाटील जानापुरीकर उपस्थित होते.

