
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। डॉ शंकररावजी चव्हाण पत्रकारिता पुरस्कार मागील चौदा वर्षांपासून वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरीत असणाऱ्यांना ५ जानेवारी रोजी सह्याद्री रेस्टहाऊस येथे प्रदान करण्यात येणार असून मराठी पत्रकर संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर यांना स्व.अनिल कोकीळ स्मृती पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.बहूमानाचा हा पुरस्कार मिळाल्या बदल नायगांव मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा दर्पन दिन कार्यक्रमात शंकरनगर ( रामतिर्थ ) येथे सत्कार करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

नायगांव तालुक्यात मागील ३३ वर्षांपासून माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकरांनी आपल्या रोखठोक लेखणीच्या माध्यमातून जनसामान्य लोकांना अनेकदा न्याय मिळवून देत कार्यक्षमता नसणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तृत्ववाची जाणीव करून भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या बाहेरचं रस्ता वास्तव लिखाण करून दाखविला. तसेच नायगांव तालुक्यात पत्रकारांच्या हितासाठी व आम्ही आमच्यासाठी याहेतुने आपत्कालीन निधी संकल्पना मांडून दोन वर्षांपासून सातत्याने हा निधी जमा होत असल्याने परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी या उपक्रमाची स्तुती केली.

अनेकदा समाजोपयोगी अन् लोकाभिमुख उपक्रम देखील राबविल्याने अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ मुंबई येथील वरच्या पातळीवर नायगांव मराठी पत्रकार संघास गंगाखेड येथे मराठवाडा स्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त करून देण्यासाठी सुर्यकांत सोनखेडकरांनी महत्वाची भूमिका घेतली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील असंख्य पत्रकारांनी नुतनवर्षाचे औचित्य साधून व पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या कार्यालयास भेट देत नायगांव मराठी पत्रकार संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी जेष्ठ पत्रकार सोनखेडकर यांना शुभेच्छा दिल्या.

