
नविन नांदेड। पुरुषप्रधान संस्कृतीचे प्राबल्य असलेल्या भारतीय समाजात स्त्रियांचे शोषण हे स्त्रियांकडून मोठ्या प्रमाणावर होते. क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे कार्य आणि आदर्शाचा परामर्श घेतल्यास समस्त महिलांच्या जीवनात सुख समाधान आणि उन्नतीचा नवी दिशा निर्माण होईल, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा बालसंरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाच्या वसंतराव नाईक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन म्हणून विद्या आळणे बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार होते. प्रो. डॉ. आर. डी. मोरे, उपप्राचार्य डॉ. व्ही. आर. राठोड यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना विद्या आणि म्हणाल्या की, माझ्याकडे दररोज स्त्रिया आणि मुलींच्या शोषणाच्या, अन्यायाच्या घटना येत असतात. परंतु त्यातील बोटावर मोजण्या इतक्या घटना सोडल्या तर बहुसंख्य घटनांना कुटुंबातील स्त्रियाच जबाबदार असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासाठी स्त्रियांनी क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल केली तर स्त्रियांचे जीवन अधिक चांगले होईल. पुरुषांनीदेखील स्त्रियांना सन्मानाची वागणूक देणे गरजेचे आहे.

या याप्रसंगी प्रो. डॉ. रेणुका मोरे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या त्यागामुळेच आज महिला विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत असे सांगितले. सावित्रीबाईंनी जर शिक्षणाचा वसा घेतला नसता तर कदाचित आजही स्त्रीचे कार्यक्षेत्र ‘चूल आणि मूल’ एवढेच मर्यादित राहिले असते, असेही डॉ. मोरे यावेळी म्हणाल्या.

अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे समाजसुधारणा, स्त्री-शिक्षण याबरोबरच मराठी कवितेच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल मौलिक मार्गदर्शन केले. सावित्रीबाईंनी ‘काव्यफुले’ आणि ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ या दोन कविता संग्रहाच्या माध्यमातून समाजजागृती केली असल्याचे डॉ. घुंगरवार यांनी मत व्यक्त केले. याप्रसंगी जळगाव येथे संपन्न झालेल्या रासेयोच्या आव्हान-२२ या शिबिरात सहभागी झालेल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विशाल गायकवाड याचा सत्कारही करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नागेश कांबळे, सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.साहेबराव शिंदे यांनी तर डॉ. रंजना अडकिने यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा. डॉ.पी. एल. चव्हाण, डॉ.पी.बी. बिरादार, डॉ.जी.वेणुगोपाल, डॉ. व्यंकटेश देशमुख, डॉ. डी. एस. पालीमकर,डॉ.एम.के. झरे, डॉ. आर.एम.कागणे, प्रा.एस.पी. शिंदे,डॉ. यू. एस.कानवटे, डॉ. व्ही. व्ही. मोरे, डॉ. जी. एल. लिंगमपल्ले, डॉ.एस.जी. मोरे, अधीक्षक आर.डी.राठोड, डॉ. शोभा वाळुक्कर, प्रा.बी.बी. ब्रदवाल, प्रा.नंदिनी सुधाकर, प्रा. जायचे, प्रा.माधव मुस्तापुरे, प्रा. रावसाहेब झांबरेसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

