
नांदेड| गेल्या अडतीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात वावरत असताना वर्षभरात ७८ जगावेगळे उपक्रम राबविणारे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना महात्मा कबीर समता परिषदेचा ” महाराष्ट्र रत्न ” पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात प्रदान करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू बलदेवसिंह चव्हाण हे होते.व्यासपीठावर सांगलीचे ज्येष्ठ समाजसेवक नारायण पाटील,बसपाचे मनिष कावळे,समाजसेविका जयश्री जायस्वाल, ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, नांदेडभूषण सरदार नवनिहालसिंघ जहागीरदार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना महात्मा कबीर समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मुकुंदराज पाटील यांनी असे सांगितले की, तेरा वर्षात लोक सहभागातून सहा लाखापेक्षा जास्त जेवणाचे डबे गरजूंना वाटप करणारे दिलीप ठाकूर यांनी समाजसेवेमध्ये एक अनोखा पायंडा पाडलेला आहे.


रस्त्यावर फिरणाऱ्या वेड्या लोकांना दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी एकत्र करून त्यांची दाढी कटिंग करण्यात येते. त्यानंतर स्वच्छ पाण्याने अंघोळ घालून नवीन कपडे व शंभर रुपये बक्षीस देण्याचा आगळावेगळा कायापालट हा उपक्रम गेल्या २४ महिन्यापासून सुरू आहे. दरवर्षी हिवाळ्यात ४० मध्यरात्री फिरून रस्त्यात कुडकुडत झोपलेल्या बेघर नागरिकांना २००० पेक्षा जास्त ब्लॅंकेट चे वाटप गेल्या चार वर्षापासून त्यांच्या मार्फत करण्यात येत आहे. पावसाळ्यात कृपा छत्र या उपक्रमां अंतर्गत आतापर्यंत चार वर्षात आठ हजारापेक्षा जास्त छत्र्याचे वाटप करण्यात आले आहे.


उन्हाळ्यात अनवाणी फिरणाऱ्या व्यक्तींसाठी चरणसेवा या उपक्रमांतर्गत चप्पला वाटप करण्यात येते. देशातील सर्वात मोठे कविसंमेलन असणारे नरेंद्र देवेंद्र महोत्सवाला गेल्या वीस वर्षापासून लाखो रसिक रात्रभर उपस्थित राहतात. स्वतः ४२ वेळा रक्तदान करून ५६०० पेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्या दिलीप ठाकूर यांनी जमा केले आहेत. भाऊचा माणुसकीचा फ्रिज हा उपक्रम नांदेड शहरात सध्या गाजतोय. अन्न वाया जाऊ नये तसेच नांदेड शहरात कोणीही उपाशी राहू नये यासाठी हा फ्रिज ठेवण्यात आला आहे. दररोज किमान ४० डबे या फ्रिजमध्ये ठेवण्यात येतात.

सामाजिक कार्यासोबतच धार्मिक कामात देखील भाऊ अग्रेसर आहेत. दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला नांदेड ते सत्यगणपती अशी पदयात्रा ते काढतात.आत्तापर्यंत १५१ वाऱ्या पूर्ण झाले आहेत.याशिवाय दत्त जयंतीला नांदेड ते माहूर आणि तिसऱ्या श्रावण सोमवारी नांदेड ते औंढा नागनाथ पदयात्रा काढून चालण्याची सवय अनेकांना त्यांनी लावली आहे. अवघड असणारी अमरनाथ यात्रा ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू करून त्यांनी हजारो ज्येष्ठ नागरिकांना दर्शन घडविले आहे. हरिद्वार वाराणसीच्या धर्तीवर नांदेड येथे गोदावरी गंगापूजन कार्यक्रमात हजारो महिला दरवर्षी उपस्थित असतात.एसटी कर्मचारी गणेश मंडळाला गेल्या ३४ वर्षापासून दरवर्षी गणपतीची मूर्ती दिलीपभाऊ देत असतात.

त्यांच्याकडे देश विदेशातील ५०० पेक्षा जास्त गणेश मूर्तींचा संग्रह आहे.स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, विविध क्रीडा स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ,शालेय साहित्य वाटप,आरोग्य तपासणी शिबिर, मोफत औषधी वाटप,होळीचे महामूर्ख कविसंमेलन असे असंख्य कार्यक्रम गेल्या ३८ वर्षापासून दिलीपभाऊ घेत आहेत. कोरोना काळात बाहेर गावाहून शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना घरोघर जाऊन त्यांनी जेवणाचे डबे वितरित केले.स्वतःला कोरोना झाल्यानंतर हतबल न होता कॅम्प मध्ये असणाऱ्या रुग्णांसोबत योगा- प्राणायाम व विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेऊन भाऊंनी कोरोना रुग्णांमध्ये नवीन उमेद जागवली.नांदेड मध्ये कोरोना लस देण्यास सुरू झाली त्या दिवसापासून आज पर्यंत ६६० दिवस पूर्ण झाले आहेत.

दररोज दवाखान्यात ते मास्क,सॅनिटायझर बिस्किट व पाण्याची बॉटल वितरित करतात. जोपर्यंत लस देणे सुरू राहील तोपर्यंत हा उपक्रम चालू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. अशा या समाजसेवेसाठी वाहून घेतलेल्या अवलियाला ” महाराष्ट्र रत्न ” हा पुरस्कार देताना संस्थेला अतिशय आनंद होत आहे. सत्काराला उत्तर देताना दिलीप ठाकूर यांनी असे सांगितले की, ” महाराष्ट्र रत्न ” हा पुरस्कार मिळाल्यामुळे आपण योग्य मार्गाने जात असल्याचा प्रत्यय आला आहे. त्यांच्यावरची जबाबदारी आणखी वाढली आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आशा घुले यांनी तर आभार प्रदर्शन उत्तम काशिंदे यांनी केले.सभागृहात प्रचंड संख्येने जनसमुदायाची उपस्थिती होती.रेड एफएम रेडिओ तर्फे नुकताच मिळालेला नांदेड का सांता या पुरस्कारानंतर ” महाराष्ट्र रत्न ” पुरस्कार दिलीप ठाकूर यांना मिळाल्याने पुरस्काराची संख्या ७४ झाल्यामुळे अनेकांनी कौतुक केले आहे.