
नांदेड। सुप्रसिद्ध नाटककार पं. विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने बुधवार दिनांक ४ जानेवारी २०२३ रोजी गिरीराज मंगल कार्यालयात स्वरसभा नांदेड व पं. विद्याधर प्रतिष्ठान मुंबई यांच्या सहयोगाने ‘पंडितराज विद्याधर’ हा पं.विद्याधर गोखले यांच्या संगीत नाटकांतील नाट्यगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात नांदेड येथील सुप्रसिद्ध कलावंत सुरमणी प्रा. धनंजय जोशी, सुप्रसिद्ध गायक संजय जोशी आणि सौ. चंदल आडगावकर (संभाजीनगर) यांनी सुंदर नाट्यगीते सादर करून नांदेडकर रसिकांची मने जिंकली.


आरंभी मान्यवर कलावंत तसेच स्वरसभा नांदेड चे डॉ. दि. भा. जोशी, अभयराव शृंगारपुरे, दि. मा. देशमुख, गिरीश देशमुख, सौ. संगीता चौधरी कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर संगीत नाटकांच्या परंपरेतील विद्याधर गोखले यांच्या नाटकातील ‘सप्तसूर झंकारीत बोले’ या नांदीने तिन्ही गायक कलावंतांनी कार्यक्रमाची बहारदार सुरुवात केली. त्यानंतर पं. विद्याधर गोखले यांच्या सुवर्णतुला, मंदारमाला , मदनाची मंजिरी, मेघमल्हार , जय जय गौरी शंकर आणि स्वरसम्राज्ञी या सदाबहार नाटकांतील नाट्यपदे सादर करताना प्रा. धनंजय जोशी यांनी जय शंकरा गंगाधरा , सुख संचारक पवन, रतीहून सुंदर मदन मंजिरी तर संजय जोशी यांनी मजला कुठे न थारा , धीर धरी धीर धरी, नारायण नारायण तसेच सौ. चंदल आडगावकर यांनी सोहम हर डमरू बाजे, अंगनी पारिजात फुलला, येतील कधी रघुवीर अशी एकापेक्षा एक नाट्यगीत गायनाने मैफलीत रंग भरत गेला.


या संपूच नये असे वाटणाऱ्या मैफलीचा समारोप ‘तुज वंदन गान शारदे’ या सुंदर भैरवीने झाला. या गायक कलावंतांना प्रा. डॉ. जगदीश देशमुख (तबला), शांतीभूषण देशपांडे चारठाणकर (संवादिनी), भगवानराव देशमुख (सहवाद्ये) या दिग्गज कलावंतांनी वाद्यांवर साथ करून रंग भरला. या कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन सुप्रसिद्ध निवेदक गोविंद पुराणिक यांनी केले.


विद्याधर प्रतिष्ठान मुंबई यांच्या तर्फे ४ जानेवारी रोजी महाराष्ट्रात एकाच वेळी दहा शहरात हा कार्यक्रम सादर होत आहे. या प्रतिष्ठान चे प्रतिनिधी म्हणून सुप्रसिद्ध गायिका कलावंत सौ. संगीता चौधरी कुलकर्णी (पुणे) या उपस्थित होत्या. नांदेडला या कार्यक्रमाची संधी दिल्याबद्दल स्वरसभे तर्फे सौ संगीता चौधरी यांचे तहसीलदार किरण अंबेकर यांचे हस्ते स्मृती चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना अभय शृंगारपुरे यांनी केली तर सूत्र संचालन गिरीश देशमुख यांनी केले.

या कार्यक्रमास पं. रत्नाकर आपस्तंभ, पंडिता सीताभाभी, नरेंद्र देशपांडे, सुधीर पुरकर, प्रा. अभिजित आपस्तंब, डॉ. सुजाता जोशी पाटोदेकर, आर.के. देशपांडे, वसंतराव वाळकीकर, प्रशांत गाजरे, सौ.सारिका व चेतन पांडे, डॉ. प्रमोद देशपांडे , जयंत वाकोडकर, प्रा. व्यंकट कोत्तापल्ले, सुधाताई नरवाडकर, सौ. सारिका सरोदे , प्रमोद तेलंग, गीता पुराणिक , ज्योती जोशी या मान्यवरांसह असंख्य रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्वरानंद घेतला व पुनश्च स्वरसभा जोरात सुरु झाल्याचा प्रत्यय आला.

कार्यक्रमासाठी स्वरसभा नांदेड चे डॉ. दि. भा. जोशी (अध्यक्ष), सुरमणी प्रा. धनंजय जोशी (सचिव), अभयराव शृंगारपुरे (कोष प्रमुख) तसेच दि. मा. देशमुख, डॉ. अरविंदराव देशमुख, गिरीश देशमुख, सौ.मंजुषा प्रमोद देशपांडे आणि सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली होती.
