
नांदेड,अनिल मादसवार| स्पर्धेच्या युगात बातमीकरीता अनेकवेळा चुकीची बातमी प्रसारीत होते. त्यामुळे इतरांची प्रतिमा मलीन होऊ शकते. त्यामुळे कुठल्याही वृत्ताचे लिखाण करीत असताना पत्रकारांनी स्वतः ला आचारसंहिता लाऊन घ्यावी. समाजाच्या हितासाठी वास्तववादी लिखाण करावे, असे प्रतिपादन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.


दर्पण दिनानिमित्त एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयात प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांनी दि. ६ जानेवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यीक देवीदास फुलारी, तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जि. प. चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, संपादक केशव घोणसे पाटील, संपादक संतोष पांडागळे, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी श्रीनिवास भोसले, ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी, लोकशाही टीव्हीचे कमलाकर बिरादार पाटील, आयोजक प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


यावेळी पुढे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की, इ.स. १८३२ मध्ये आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेची बीज रोवले. मराठी आणि इंग्रजी दर्पण हे वृत्तपत्रे काढले. त्यानंतर मराठा, मुकनायक, दर्पण या दैनिकांनी येथील विविध प्रश्न मांडले. त्यामुळे स्वातंत्र्याच्या काळात या वृत्तपत्रांनी क्रांती केली. समाजाच्या उन्नतीमध्ये वृत्तपत्रांचे अनन्यसाधारण महत्व आहे. आज आपण पाहतोय, विविध प्रसारमाध्यमे विविध स्वरूपाचे वृत्त प्रसिद्ध करतात. हे करत असताना अनेकवेळा इतरांच्या जीवनमानावर याचा परिणाम होऊन त्याची बदनामी होताना काही प्रकार आपण पाहतो. असे न होऊ देता पत्रकारांनी प्रत्येक बातमीची शहानिशा करून वृत्त प्रकाशित केले पाहिजे. किंबहुना बातमीसंदर्भात स्वतःला नियमावली लाऊन घेतली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना ज्येष्ठ साहित्यीक देवीदास फुलारी म्हणाले की, सोशल मीडियामुळे अनेकवेळा सत्यबाबी आपल्यासमोर येत नाहीत. एका निवडणुकीमध्ये फेसबुकचे अकाऊंट अनेक काढून त्या नेत्याने प्रभावीपणे स्वतःचा प्रचार केला. त्यामुळे त्याला त्या निवडणुकीत यश मिळाले. वास्तविक पाहता फेक अकाऊंट त्यांचे फेसबुकचे होते. त्यामुळे सोशल मीडियावर जे दिसते ते सत्य असे म्हणता येणार नाही. १९३५ नंतर २०१६ मध्ये नोबेल पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रात मारीया यांना मिळाला. तेव्हा तिने आपल्या आत्मकथनात फिलीपीयन देशाचे लोक मर्यादपेक्षा अधिक फेसबुकचा वापर करत असल्याबद्दल दुःख व्यक्त करून सोशल मीडिया वास्तवसत्य समोर मांडत नाही. त्यामुळे छापलेल्या वृत्तपत्राची अधिक महत्व आणि वृत्ताची विश्वासहर्ता अधिक असल्याचे सांगितले. आयोजक डॉ. गणेश जोशी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी स्तुती केली.

आजच्या सोशल मीडियाच्या युगात सर्वात अगोदर बातमी आपल्याकडेच यावी यासाठी पत्रकांरामध्ये मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धे त आपल्याकडून चुकीची बातमी लागू नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. पत्रकारांचा प्रशासनावर चांगलाच प्रभाव आहे. एखादी घटनेची शोध पत्रकारांना अगोदर माहिती लागते. त्यासाठी त्यांचा संपर्क जास्त असायला पाहिजे, माहिती मिळाली तर ती बातमी आपल्याकडे येण्यासाठी घाई होते. अशा वेळी चुकीची बातमी लागली तर एखाद्याचे आयुष उद्धवस्त होऊ शकते, बातमी घेताना माहितीची खातर जमा करावी, पत्रकार आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. कायद्यात राहून पत्रकारिता करावी, नवोदितांनी हे क्षेत्र निवडताना एक विषय निवडला तर चांगली पत्रकारिता करता येईल असे जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले.

वृत्तपत्रातील लिखाणाचा फायदा सामाजिक जीवनातील अनेकांना होत असतो, पण स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा अधिक होतो, मी वृत्तपत्र नेहमी वाचत असतो म्हणून दररोज घडणाऱ्या घटनांची माहिती मिळते. प्रशासकीय सेवेत अल्यानंतर प्रशासन आणि पत्रकार याचं जास्त जुळत नाही. सामाजिक जडण घडीत वृत्तपत्रांचे योगदान महत्वाचे राहीले आहे, असे जि. प. चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी सांगितले.

पत्रकारितेत आज खुप बदल झाले आहेत. पत्रकारिता क्षेत्रात येणाऱ्यांना आपण समर्थ आहोत का ? याचा विचार करावा, पुर्वी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा काम करणे अवघड होते. येथून माहिती मुंबई पाठविण्यासाठी कॅसेटने माहिती पाठवावी लागत असे, पण आता कोणत्याही ठिकाणाहून बामती लाईव्ह दाखवू शकतो. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये नवोदितांना खुप संधी उपलब्ध आहेत. पत्रकारितेत वाव असल्याने अनेकजण याकडे वळत आहेत. सोशल मीडिया आला तरी वृत्तपत्रांची गरज संपणार नाही तर ती वाढत जाणार आहे. कारण सोशल मीडियाला विश्वासहर्ता नाही, वृत्तपत्रांनी विश्वासहर्ता जपली आहे. या क्षेत्रात येणाऱ्यांनी लिखाणावर लक्ष केंद्रीत करून नवनवीन तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक आहे, असे मत संपादक केशव घोणसे पाटील यांनी व्यक्त केले.
पत्रकार हा समाजाचा आरसा असून आता पत्रकारितेमध्ये मोठे बदल झाले आहेत. सोशल मीडियामुळे नवीन आव्हाने निर्माण झाले आहेत, ती आव्हाने पेलत विद्यार्थ्यांनी चांगले पत्रकार होण्यासाठी पत्रकारितेची पदवी करत आहेत, पण पदवी घेऊन चांगले पत्रकार होतील असे नाही. शिक्षण घेऊन चांगले पत्रकार होण्यासाठी वास्तव पत्रकारितेमध्ये उतरावे लागेल, असे जेष्ठ पत्रकार संतोष पांडागळे यांनी सांगितले.
प्रास्ताविकेत प्राचार्य डॉ. गणेश जोशी म्हणाले की, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडत आहोत. अशा चर्चासत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वृत्तपत्र क्षेत्राचे ज्ञान अवगत व्हावे हा हेतु आहे, असे म्हणत त्यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीचा आलेख विस्तृतपणे सादर केला.
दर्पण दिनानिमित्त पत्रकार रविंद्र कुलकर्णी, राजकुमार कोटलवार, सुर्यकुमार यन्नावार, राजेश शिंदे, राम तरटे, प्रशांत गवळे, सुरेश आंबटवार, शरद काटकर, शिवाजी शिंदे, शरद वाघमारे, श्रीधर नागापूरकर आदी जणांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋषीकेश कोंडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. राज गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रा. प्रविणकुमार सेलूकर, प्रा. सुरभी जैन, दिशा कांबळे, परमेश्वर जगताप आदींनी परिश्रम घेतले.