
हिमायतनगर,अनिल मादसवार। शहरासह तालुका परिसरात गेल्या महिन्याभरापासून अवैध रेती व मुरमाची मोठ्या प्रमाणात चोरी केली जात आहे. हा प्रकार राजकीय वरदहस्त असलेल्या माफियाकडून दिवस-रात्र सुरू असल्यामुळे शासनाच्या महसूल बुडतो आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार हिमायतनगर येथील तहसीलदार गायकवाड यांनी भरारी पथक स्थापन केले आहेत.


याचं भरारी पथकाचे नायब तहसीलदार अनिल तामसकर यांनी काल रात्रीला ग्रस्त केली असता पीचोंडी तलावाच्या ठिकाणाहून एका जेसीबी द्वारे विना परवानगी उत्खनन करून विविध ट्रॅक्टर मधून मुरूमाची वाहतूक करत चोरी केली जात असल्याचा प्रकार उघड झाला. महसूल अधिकारी आल्याच समजताचं अनेक वाहने पसार झाली असून, दोन ट्रॅक्टर मुरमासह जप्त करून हिमायतनगर तहसील कार्यालयात लावण्यात आले आहेत.


दरम्यान उत्खनन करणारे जेसीबी घेऊन पळून जाण्यास माफिया यशस्वी झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. सदरील जेसीबी व पकडून आणण्यात आलेल्या दोन वाहनावर अवैधरित्या उत्खनन करून गौण खनिज अधिनियम चे उल्लंघन केल्या प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दंडात्मक कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती नायब तहसीलदार तामस्कर यांनी दिली. ही कार्यवाही उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील तहसीलदार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर महसूलचे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी मनोज खंदारे, सचिन जावरकर, तलाठी दिलीप मेतलवाड यांच्या पथकाने केली आहे. आणि दोन ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात येथे जप्त करून लावले आहे.


एकूणच या गौण खनिज प्रकरणी कार्यवाही झाल्यानंतर मुरूम रेती सह इतर गौण खनिजाचे चोरी करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. भरारी पथकाकडुन पकडण्यात आलेल्या दोन वाहनावर आणि जेसीबी वर काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हिमायतनगर तालुक्यात सुरु असलेल्या अशा प्रकारच्या गौण खनिज चोरीवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी हिमायतनगर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची गरज आणि घरकुलधारकांना आवश्यक असलेल्या रेती, मुरूम या गौण खनिज उपलब्ध करून देण्यासाठी रेती घाटाचे लिलाव करून रॉयल्टी भरून नियमानुसार मुरूम उत्खनन करण्याची परवानगी घ्यावी. जेणे करून गोरगरिबांना अल्प दरात रेती आणि मुरूम मिळण्याची सुविधा उपलब्ध होईल. अशी मागणी जोर धरत आहे.

मागील वर्षी हिमायतनगर तालुक्यातील सर्व रेती घाटाचे लिलाव केल्यामुळे घरकुलधारकांना अल्पदरात रेती उपलब्ध झाल्यामुळे अनेकांच्या घरकुलाचे स्वप्न साकार झाले होते. मात्र यंदा घरकुल मंजूर असताना देखील अव्वाच्या सव्वा दराने रेती विकत घ्यावी लागत असल्याने शासनाने हिमायतनगर तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव करून अल्प दरात घरकुलधारकांना रेती उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
