
नांदेड| शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद नांदेड श्रीमती डॉ.संगीता बिरगे यांचा पी.एच.डी. प्रबंध तपासून पडताळणी करणे आणि मागील निवेदनातील मागण्या प्रमाणे त्यांनी कारवाई केली नसल्यामुळे त्यांच्यावर आणि गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदेड श्री नागराज बनसोडे यांच्यावर कठोर कारवाई करणे बाबत निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दि.६ जानेवारी सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी दिले आहे.


जिल्हा परिषद नांदेड येथे कार्यरत असलेल्या शिक्षणाधिकारी (प्रा.) ह्या अनेक वेळा वादग्रस्त ठरल्या असून त्यांच्याकडे नांदेड शहरातील बोगस शिक्षण संस्था प्रजा बालक विद्या मंदिर शाळे विरोधात अनेक तक्रारीचे निवेदने देऊन योग्य आणि कठोर कारवाई करण्यासाठी माकप आणि सीटू संघटनेच्या वतीने पाठपुरावा चालू आहे.अनेक आंदोलने झाली आहेत परंतु संस्था चालकासोबत आर्थिक व्यवहार करून त्यांनी कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही.


संबंधित संस्था चालकाकडून चिरीमरी घेऊन त्यांनी आणि गट शिक्षणाधिकारी पं.स. नांदेड श्री. नागराज बनसोडे यांनी योग्य कारवाई केली नाही. प्रजा बालक विद्या मंदिर गांधीनगर शाळेचे शिक्षक श्रीमती आशा गायकवाड आणि श्री केशव धोंगडे यांची फसवणूक प्रजा बालक विद्या मंदिर शाळेने केली आहे. त्या अनुषंगाने अनेक वेळा मोर्चे आंदोलने झाली आहेत.


मा.जिल्हाधिकारी, नांदेड आणि मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना अनेक वेळा निवेदने देऊन उपोषण,धरणे व मोर्चामध्ये मागणी घेऊन ही योग्य कारवाई न करणाऱ्या शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदेड यांच्यावर कारवाई म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड यांना देखील पत्र व्यवहार केला आहे. परंतु कुठलीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही. हे अर्जदार पीडित शिक्षकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. या अनुषंगाने केलेल्या तक्रारीची पडताळणी करून आपल्या स्तरावरून कारवाई करावी अशी विनंती कॉ.गंगाधर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प. नांदेड यांच्या पीएच.डी.ची चॊकशी करावी जेणेकरून इतर प्रबंध आणि त्यांच्या प्रबंधामध्ये साम्य आढळून येते काय ते तपासावे. तसेच गट शिक्षणाधिकारी पं.स.नांदेड आणि शिक्षणाधिकारी जि.प.यांची खातेनिहाय चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रति शालेय शिक्षण मंत्री आणि शिक्षण आयुक्त पुणे यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आल्या आहेत.
