
पुणे, दिपक बिडकर| ‘इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग अँड फायनान्शियल सोल्युशन्स् ‘ या संस्थेच्या वतीने बँकिंग परीक्षांच्या तयारीसाठी http://institutefortrainingandfinancialsolutions.co.in हे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून त्याचे लोकार्पण टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ श्री. ग. बापट यांच्या हस्ते झाले.बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ प्रशिक्षक श्रीधर नागनूर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. इन्स्टिट्यूट च्या वतीने निशिकांत देशपांडे , विनायक देशपांडे यांनी स्वागत केले. शानू पटेल, संजीव कुलकर्णी, माधव धायगुडे, निकिता मोरे उपस्थित होते.दि ७ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता श्री शानू पटेल शैक्षणिक संकुल, वारजे येथे हा कार्यक्रम झाला.


डॉ. श्री. ग. बापट म्हणाले, ‘ ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्वस्व ओतून शासकीय स्पर्धा परीक्षासाठी तयारी करतात. सर्वांना यश मिळू शकत नाही, म्हणून निराश होऊ नये. एकाच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांवर अवलंबून राहू नये.त्यांनी बँकिंग,वीमा कंपन्यांसारख्या परीक्षांकडे वळले पाहिजे. बँकिंग आणि विमा कंपन्यांच्या परीक्षांमध्ये समान सूत्र आढळेल. आणि यश मिळवणे सोपे होईल. हल्ली सर्व परीक्षा पध्दत बदलत आहेत.


शिक्षण पध्दती बदलत आहे . त्यामुळे स्पर्धा परीक्षांना मार्ग दर्शन करणारे संकेतस्थळासारखे मार्ग उपयोगात आणले पाहिजे.आताच्या पिढीला असे तंत्र स्नेही मार्गदर्शन आवडणारे आहे. या संस्थेचे संकेतस्थळ हा योग्य दिशेने चालू झालेला उपक्रम आहे. चांगले मनुष्यबळ मिळत नाही, हे सर्व आस्थापनांचे दुःख आहे.चांगल्या प्रशिक्षित मनुष्य बळाची गरज भागविणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत होईल. ‘


श्रीधर नागनूर म्हणाले, ‘ विकास प्रक्रियेत बँकींग, विमा क्षेत्र चांगले योगदान देते. या क्षेत्राला प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक आहे. हे प्रशिक्षण आम्ही देऊ. भरतीसाठी प्रशिक्षण आणि भरतीनंतर प्रशिक्षण आवश्यक आहे. ‘इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग अँड फायनान्शियल सोल्युशन्स् ‘ संस्थेने ती तयारी ठेवावी. विद्यार्थ्यांना मूलभूत माहिती पदवी पर्यंत मिळत नाही. त्यामुळे पुढे नोकरीत, जबाबदारीच्या पदावर अडचण होते.ही अडचण दूर करायला योग्य प्रशिक्षण गरजेचे आहे.
