
नांदेड| प्रत्येकाने ज्ञानाच्या कक्षा विस्तारीत करणे गरजेचे असून प्रवास तुम्हा-आम्हाला जीवनाचे अनुभव देतो, प्रवासातूनच दुनिया सर्वांना दिसते, असे प्रतिपादन प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ व लेखक डॉ. नंदकुमार मुलमुले यांनी केले. मंगला आसोलेकर-देशपांडे लिखीत ‘नयनरम्य नॉर्वे’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.


शहरातील शास्त्रीनगर येथील गोपाळशास्त्री देव सभागृहात अभंग प्रकाश व देशपांडे परिवाराच्या वतीने रविवार दि.8 रोजी ‘नयनरम्य नॉर्वे’च्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मधुमेहतज्ज्ञ व लेखक डॉ. अच्युत बन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, यावेळी अभंग प्रकाशनचे संजीव कुळकर्णी, नीमा कुळकर्णी, सतीश कुलकर्णी मालेगावकर, लेखिका मंगला आसोलेकर-देशपांडे आदींची उपस्थिती होती.


कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन करून तसेच अवंती व्यंकटेश टाकळकर हिने गायलेल्या सरस्वती स्तवनाने झाली. यावेळी डॉ.नयन परळीकर देशपांडे यांनी गणेशस्तवन सादर केले. यावेळी बोलताना डॉ. मुलमुले म्हणाले की, हा प्रवास वर्णनाचा कौतुक सोहळा असून ‘नयनरम्य नॉर्वे’ हे अतिशय देखणं पुस्तक आहे. लेखिका मंगला आसोलेकर -देशपांडे यांनी या पुस्तकात नार्वेच्या वास्तव्यात आलेले अनुभव लिहिले असून तेथील वैद्यकीय सेवेबद्दल ही लिहिले आहे, भारतातील वैद्यकीय सेवा अतिशय उत्तम असून परदेशातील वैद्यकीय सेवा ही अतिशय क्लिष्ट आहे, असे डॉ. मुलमुले म्हणाले.


पीएचडीच्या प्रबंधाचा व्हायवा सार्वजनिक केला , जातो हा नवीन अनुभव असून त्याचे यथार्थ वर्णन लेखिकेने ‘डिफेन्स’ मधून केले आहे.दृष्टी सगळ्यांना असते ; परंतु दृष्टीकोन चांगला असला पाहिजे नार्वेच्या प्रवासातून मंगला आसोलेकर देशपांडे यांना एक नजरिया प्राप्त झाला व नातीच्या आग्रहामुळे ‘नयनरम्य नॉर्वे’ या पुस्तकाची निर्मिती झाली,असे डॉ.मुलमुले यावेळी म्हणाले.

यावेळी संजीव कुळकर्णी यांनी स्वागतपर भाषण केले.सतीश कुलकर्णी यांनी पुस्तकाचा परिचय करून देत लेखिकेच्या कल्पकतेचे कौतुक केले. या पुस्तकातून लेखिकेने नार्वेमधील विविध बाबींचा अभ्यास करत निरीक्षणे नोंदवली आहेत , आंतरराष्ट्रीय पातळीवर हे पुस्तक दर्जेदार ठरावे, असे झाले असून पुस्तकाची एकूणच निर्मिती अतिशय चांगली झाली आहे, असे ते म्हणाले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना लेखिका मंगला आसोलेकर -देशपांडे म्हणाल्या की, नार्वेच्या वास्तव्यातील आलेेले विविध अनुभव लिखीत स्वरूपात दे असे माझ्या नातीने सांगितले होते. तिच माच्या लेखनामागची प्रेरणा आहे. तेथील कुटंबव्यवस्था, स्वच्छता ,स्त्रीयांचा दर्जा, वैद्यकीय सेवा यासह विविध बाबींचा अभ्यास करत निरीक्षणे नोंदविण्याचे काम मी केले. विशेषतः नार्वेमधील निर्मळ मनाची माणसे मला भावली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नीमा कुळकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.परितोष देशपांडे यांनी केले. डॉ.नयन परळीकर देशपांडे यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास डॉ.सुरेश सावंत,डॉ.केशव सखाराम देशमुख ,डॉ.श्रीकांत लव्हेकर, भगवंत क्षीरसागर, मधुकर धर्मापुरीकर, राम शेवडीकर, शंतनु डोईफोडे ,नीळकंठ पाचंगे, वसंत मैय्या, उमाकांत जोशी, डॉ. सुनील वझरकर ,आशा पैठणे, श्रीनिवास पांडे डॉ.गणेश जोशी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
चांगल्या प्रवासवर्णन लेखिकेेचा उदयः डॉ.बन
कोरोनामुळे अनेकांमधल्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला असून उत्तम वाचकांचे लेखकात रूपांतर झाले आहे. अनेकांकडून सृजन निर्माण झाले आहे. मंगला आसोलेकर देशपांडे यांनी नयनरम्य नार्वेमधून समयोचित सुंदर लिखाण केले आहे. पुस्तकातील भाषाशैली अतिशय सुंदर आहे,अंगी व्यक्त होण्याची उर्मी असल्याशिवाय असे सृजन निर्माण होवू शकत नाही. मी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली असून हा माझ्यातील हौशी पर्यटकाचा सन्मान आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून एका चांगल्या प्रवासवर्णन लेखिकेचा उदय झाला आहे, असे प्रतिपादन डॉ. अच्युत बन यांनी यावेळी केले.