
नवीन नांदेड। जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचलित शिवाजी विद्यालय, सिडको, नांदेड या शाळेत आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते.


या आनंद नगरीचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला.आनंद नगरीतीलविद्यार्थी-विद्यार्थिनीनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री,खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे मुख्याध्यापक प्रा.व्ही.के. हंगरगेकर व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक प्रा. व्ही.के.हंगरगेकर यांच्या हस्ते आनंद नगरीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पर्यवेक्षक एन.एम. भारसावडे, नांदेडच्या जिल्हा प्रशिक्षण आयुक्त सौ. भगिरथी बच्चेवार उपस्थित होते. यावेळी स्काऊट व गाईड प्रमुख जी.ए जाधव, सौ.ए.के.जांबकर, सौ.ए.ज़ी.देगावकर,बी.के.सुब्बनवाड यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.


विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद नगरीचे आयोजन केले जाते. या वर्षी शालेय विद्यार्थ्यांनी १०० स्टॉल उभारले होते. कार्यक्रम यशस्वी यशस्वीतेसाठी एनसीसी कॅडेट्स व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
