
नांदेड| एस टी कामगारांच्या न्याय हक्कासाठी आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधात सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ सोमवार दि 9 जानेवारी 2023 पासून आंदोलन करणार आहे.


नांदेड विभागातील अधिकाऱ्यांचा कर्मचाच्यावर निर्माण होणारा दबाव,सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ्याच्या सदस्य आणि पदाधिकारी यांच्यावर सूडबुद्धीने होणाऱ्या कार्यवाह्या ह्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरवून शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम चालू असल्याने सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाने आंदोलनाचे शस्त्र उचलले आहे.


नांदेड विभागातील कर्मचाऱ्यांना गाड्या अभावी अथवा प्रशासनाच्या चुकीमुळे कर्तव्य मिळत नाहीत त्यामुळे त्या दिवशी चालक वाहकांना सक्तीने रजा घेतल्या जातात. महाव्यवस्थापक यांचे परिपत्रक असून सुद्धा त्या परिपत्रकाला केराची टोपली प्रशासनाकडून दाखवली जाते आणि कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जातो. नांदेड विभागात झालेल्या बदल्या ह्या नियमबाह्य करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता असल्याने त्याची चौकशी झाली पाहिजे आणि मुर्दाड प्रशासन जागे झाले पाहिजे आणि कामगारांना न्याय मिळाला पाहिजे.


सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाकडून प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी वारंवार प्रत्यक्ष भेटून आणि 4 वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा प्रशासनाने कोणत्याही पत्राची दखल घेतली नाही. सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या पदाधिकारी आणि सदस्यांना जाणीवपूर्वक लक्ष करून त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही,नियमबाह्य दंड करणे आणि कर्मचाऱ्यांवर अन्याय असे प्रकार नांदेड विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सुरू आहेत.

त्यामुळे दि 28/12/2022 रोजी प्रशासनाला 7 जानेवारी पर्यंत आमच्या समस्या सोडवा अन्यथा 9 जानेवारी पासून विभागीय कार्यालय नांदेड येथे नांदेड विभागाचे पदाधिकारी उपोषण करतील असे निवेदन दिले होते. परंतु आमच्या निवेदनाची दखल न घेतल्याने आणि समस्या न सोडविल्याने 9 जानेवारी 2023 सोमवार पासून विभागीय कार्यालय नांदेड समोर मुजोर प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण हे अटळ आहे.
