
नांदेड। आपले विद्यार्थी शिक्षण पूर्ण घेतात पण कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये उच्च पदावर जाण्यासाठी कुठेतरी कमी पडतात. त्यामागचे कारण उद्योजक क्षेत्राला जे हवे आहे ते आपल्या अभ्यासक्रमामध्ये कमी पडत आहे. यावर उपाययोजना म्हणून औद्योगिक क्षेत्रात नेमके काय हवे आहे. याचा अभ्यास करून तशाप्रकारे अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे आपले विद्यार्थी कुठेही कमी पडणार नाहीत. औद्योगिक क्षेत्राच्या गरजेनुसार समर्पक असे शिक्षण देण्याची तयारी विद्यापीठाची आहे. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केले.


ते दि. ९ जानेवारी रोजी विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलातर्फे आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘रिसेंट अॅडव्हान्सेस इन केमिस्ट्री अँड देअर ॲप्लिकेशनस इन एनर्जी एरिया’ या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, हैदराबाद येथील शास्त्रज्ञ डॉ. एच. एम. संपत कुमार, संकुलाचे संचालक डॉ. संतोष देवसरकर, समन्वयीका डॉ. पी.के. झुबेदा, सहसमन्वयक डॉ. रमेश टाले यांची उपस्थिती होती.


नरेंद्र चव्हाण आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, रसायनशास्त्र विषयाला खूप मोठा स्कोप आहे. औषधनिर्मिती औद्योगिक क्षेत्रामध्ये रसायनशास्त्राशिवाय पर्याय नाही. दिवसेंदिवस या क्षेत्रात पावलो-पावली संशोधन होत आहे. आणि त्या संशोधनाचा समाजाला भरपूर उपयोग होत आहे. प्रदूषण निवारण तंत्र विकसित करणे ही काळाची गरज आहे. यासाठी ऊर्जा तंत्रज्ञानामधील विकास झपाट्याने होत आहे.


विभागाचे संचालक प्रा. डॉ. संतोष देवसरकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावना केली तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. ओम प्रकाश येमुल यांनी केले. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी देशभरातून रसायनशास्त्र या विषयातील संशोधक,विद्यार्थी, प्राध्यापक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
