
पुणे/रांजणगाव गणपती। शिरूर तालुका ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी विवेकानंद फंड यांची सन 2023 ते 2026 या कार्यकाळासाठी निवड करण्यात आली.


पुणे जिल्हा ग्रंथालय संघाची बिनविरोध निवडणूक शिक्षक भवन येथे नुकतीच पार पडली यावेळी सर्वानुमते रांजणगाव गणपती (ता. शिरूर)येथील विवेकानंद फंड यांना तालुका ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी निवडीचे पत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.


यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, महाराष्ट्र राज्य संशोधन परिषदेचे अध्यक्ष विजय कोलते, कार्यवाह सोपानराव पवार, ग्रंथमित्र धों.स.सुतार गुरुजी,रमेश सुतार, हमीद तांबोळी, तुकाराम रासकर , निवडणूक निर्णय अधिकारी विजय हांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.तसेच हया निवडणूक कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील ग्रंथालय संघाचे सभासद, चळवळीतील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सदर कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना शिरूर तालुक्यातील ग्रंथालयांना मार्गदर्शन करण्याबरोबर गाव तेथे ग्रंथालय योजना पोहोचवणार असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ तालुक्यातील ग्रंथालयांना मिळवून देणार असल्याची भावना विवेकानंद फंड यांनी या वेळी आपल्या मनोगतात व्यक्त केली. एका खऱ्या अर्थाने हाडामासाच्या एका ग्रंथप्रेमीची निवड झाली. साहित्याप्रती असलेला जिव्हाळा, आवड आणि नव साहित्यिकांसाठी व ग्रंथालयासाठी दिलेलं योगदान हे विस्तृत स्वरूपाचे आहे.

नव पिढीतील वाचकांची संख्या ग्रंथालया अभावी किंवा मोबाईल सारख्या माध्यमामुळे कमी झाली असली तरी गाव तिथे ग्रंथालय या योजनेतून व या ग्रंथप्रेमी अध्यक्षाच्या रूपाने का होईना इथून पुढे दिवसेंदिवस वाचकांची व साहित्यिकांची संख्या वाढेल यात काही तीळ मात्र शंका नाही.
