
नांदेड| मानवी सुख-दुःखाची व्याख्या करण्याचे काम कवितेच्या माध्यमातून होत असते. या कवितेची मांडणी करणे म्हणजे आकाशाची वीज धरण्यासारखे असून याची प्रचिती केवळ आत्मानंदातून येते. त्यामुळे कवीने केवळ स्वानंदासाठी कविता केल्या पाहिजेत तरच आयुष्याचा प्रवास जीवन उजळवून टाकणारा ठरतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुरेश सावंत यांनी केले.


जेष्ठ कवी दि. मा. देशमुख लिखित ‘शब्दवेल’ या श्रीकर प्रकाशनने सिद्ध केलेल्या कवितासंग्रहाचे दिमाखदार प्रकाशन दि.८ रोजी येथील गिरीराज मंगल कार्यालयात पार पडले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरविंदराव देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक डॉ. दीपक कासराळीकर उपस्थित होते. वक्ते म्हणून जेष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत, कवयित्री आशाताई पैठणे, कवयित्री सुवर्णाताई कळसे यांची उपस्थिती होती.


डॉ.सावंत म्हणाले, कवीमनाचे दि.मा. देशमुख यांनी केलेल्या कविता म्हणजे उज्वल गुरुपरंपरेचा गौेरव असून त्यातील कवितांना परतत्वाचा स्पर्श झाला आहे. त्यामुळे एखादा विषय घेऊन केलेली कविता उत्तरार्धात मात्र आपल्याला सामाजिक संदेश देण्याबरोबरच निसर्गाप्रती सतर्क राहण्यास सुचवते. त्यामुळे एखादी कृती करीत असताना त्याच्या परिणामाची जाणीवही कवी करून देतो हे त्यांच्या लेखनाचे यश आहे. हे केवळ एक जागरुक व सामाजिक भान असलेला कवीच करू शकतो. परंतु हे सर्व सांगत असतानाच कवी काहीतरी लपवतोय हेसुद्धा लपून राहत नाही. यातून त्यांचा एकाकी प्रवास अधोरेखित होतो.


ज्येष्ठ कवयित्री आशाताई पैठणे यांनी दि.मा.देशमुख यांच्या कवितासंग्रहामध्ये सर्वच विषयांवरील कवितांचा अंतर्भाव असल्याचे नमूद केले. या सर्व कविता कवीच्या नम्रपणाची जाणीव करून देणार्या तर आहेतच शिवाय निगर्वी व त्यांच्या स्वभावाप्रमाणेच सोज्वळ आहेत. आंतरिक उमाळ्यातून यातील कवितांची निर्मिती झाल्याचे त्या म्हणाल्या. प्रकाशकाच्या आगामी वाटचालीलाही त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.

साहित्यिक डॉ.दीपक कासराळीकर यांनी दि.मा. देशमुख यांच्या साहित्य प्रवासाला अध्यात्माचा पाया असल्याचे नमूद केले. श्लोकाला श्लोकत्व देण्याची ताकद मात्र सक्षम कवीमध्येच असते. ही ताकद येण्यासाठी वयाची नाही तर तशी वृत्ती असावी लागते. ती ताकद ‘शब्दवेल’मधून दिसून येते.
कवयित्री सुवर्णा कळसे यांनीही शब्दवेल कवितासंग्रहावर मार्मिक भाष्य केले. दि.मा. देशमुख यांच्या कविता मुक्तछंदातील असल्याने त्यांनी सर्वच विषयांना स्पर्श केला आहे. त्यांच्या प्रत्येक कवितेला अध्यात्म, भक्ती आणि वात्सल्याचे खतपाणी मिळाल्याने त्या आणखीनच समृद्ध झाल्या आहेत. पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर काही महिन्यांमध्ये दुसर्या काव्यसंग्रहाची निर्मिती म्हणजे आम्हा साहित्यिकांनाही आश्चर्याचा धक्का आहे.

अध्यक्षीय समारोपात प्रा.अरविंद देशमुख यांनीही ‘शब्दवेल’वर भाष्य केले. ते म्हणाले, कविता अशी ठरवून होत नाही ती स्फुरते आणि तसे झाले तरच ती अंतरी उतरते. साहित्यनिर्मितीला वयाची बंधने नसतात त्यामुळे त्या दिशेने एकदा प्रवास सुरू केला की थांबणे आपल्या हातात नसते. त्यातून शब्दवेल फुलत राहते, बहरते.

तत्पूर्वी ‘शब्दवेल’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक श्रीकर प्रकाशनचे गिरीश कहाळेकर यांनी केले. प्रकाशकाच्या भूमिकेतून उदयोन्मुख नवकवींच्या साहित्य प्रकाशनाला प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन दिले. नाटककार प्रमोद देशमुख यांनी सूत्रसंचालन तर जयंत वाकोडकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
सौ.दीपा यमुनवार यांनी सरस्वती स्तवन सादर केले तर दीपक बिडकर यांनी बासरीवर धून सादर करून वातावरण निर्मिती केली. सलगरकर परिवारातील भगवानराव देशमुख यांनी कवी दि.मा.देशमुख यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली. कवितासंग्रह निर्मितीमध्ये योगदान देणारे मुद्रितशोधक दिलीप वैद्य, उत्कृष्ट प्रिंटिंगबद्दल देवदत्त देशपांडे, उत्कृष्ट रेखाचित्रे बनवणार्या सौ.कविता जोशी, उत्कृष्ट मुखपृष्ठ निर्मितीबद्दल दीपक बिडकर यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी पद्मजा देशमुख हिने आभार मानले.
कार्यक्रमाला संस्कार भारती प्रांतमहामंत्री जगदीश देशमुख, प्रांत कार्याध्यक्ष भगवानराव देशमुख, सुरमनी धनंजय जोशी, डॉ. वैशाली गोस्वामी, सौ. शर्वरीताई सकळकळे, नरेंद्र देशपांडे, वसंतराव देशमुख, विद्याताई देशमुख, प्रमोद देशपांडे, सौ.रजनी वाकोडकर, अंजली देशमुख, अभय शृंगारपुरे, अॅड.राहेरकर, कवी कपिल सावळेश्वरकर, गजानन डहाळे, मुकुंद धर्मापूरीकर, व्यंकटेश इनामदार, अनिल पांपटवार यांच्यासह देशमुख यांचा परिवार व स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.