
नांदेड| शहरात पुन्हा एक खळबळजनक घटना घडली असून, इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या एका महिला कार्यकर्तीवर बाफना टी पॉइंटजवळ असलेल्या उड्डाणपुलावर सोमवारी मध्यरात्रीच्या वेळेला गोळीबार करण्यात आला. यात सादर महिलेच्या डाव्या दंडातून गोळी आरपार गेली असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गतवर्षी नांदेडमध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून नांदेड शहर हादरले आहे. पुन्हा काल काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्तीवर गोळाबार झाल्याची घटना घडल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहरातील शक्तीनगर भागात राहणाऱ्या सविता गायकवाड ह्या रात्री आपल्या दुचाकीवरून मगनपुरा येथे ११ वाजेच्या सुमारास जात होत्या. यावेळी त्यांची दुचाकी ११.१५ वाजेच्या दरम्यान बाफना उड्डाण पूलाजवळ आली असता त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवर तिघेजण आले. यामध्ये रहीम खान आणि जफर या परभणीच्या दोघांसह आणखी एक जण असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनी सविता गायकवाड यांना थांबवले आणि त्यांनी वाद घालून आपल्या जवळील पिस्तूलमधून सविता गायकवाड यांच्यावर गोळी घातली. या घटनेत सविता गायकवाड यांच्या डाव्या दंडातून गोळी आरपार बाहेर पडली आणि त्या जखमी झाल्या. यानंतर दुचाकीवर आलेले हल्लेखोर पसार झाले असे पोलिसांनी सांगितले आहे.


अशी माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांना ही माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, पोलीस उपविभागीय अधिकारी (इतवारा) डॉ. सिद्धेश्वर भोरे यांना ही माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पाहणी करून रुग्णालयात जाऊन जखमी सविता गायकवाड यांची भेट घेतली.


सविता गायकवाड आणि अतीक नावाच्या एका व्यक्तीविरुद्ध आयशर खरेदी विक्रीच्या प्रकरणात भोकर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अतीक याला पोलिसांनी अटकही केली होती. मात्र, सविता गायकवाड यांना १४ (१) (अ) नुसार नोटीस देऊन सोडण्यात आले होते. या प्रकरणात परभणी येथील रहीम खान याने साक्ष दिली होती. याचा राग मनात असल्याने ०७ जानेवारी रोजी सविता गायकवाड आणि फैसल हे दोघेजण परभणीला गेले. साक्षीदार रहीम खान याच्या घरी जावून त्यांनी विचारणा करून त्यांनी गोंधळही घातल्याचे सांगण्यात आले आहे.
