पुणे, दीपक बिडकर| ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. शरद साठे आणि आग्रा घराण्याचे गायक पं. अरूण कशाळकर यांच्या सांगीतिक विचारांचे सादरीकरण असलेला ‘गुण घेईन आवडी’ हा कार्यक्रम १२ जानेवारी रोजी गांधर्व महाविद्यालय(मेहुणपुरा) येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
‘गुण घेईन आवडी’कार्यक्रम मालिकेतील हे पहिले पुष्प असून पं. शरद साठे आणि पं. अरूण कशाळकर यांचे शिष्य मुकूल कुलकर्णी ,विशाल मोघे हेगायन सादर करणार आहेत. अरविंद परांजपे (तबला),शुभदा आठवले(संवादिनी) हे साथ संगत करणार आहेत. संपदा थिटे संवाद साधणार आहेत. ‘पं.कमलाकर जोशी शिष्यपरिवार ‘ने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.
ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गुरू पं.कमलाकर जोशी ह्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या दिग्गज कलाकार व गुरूंच्या मुलाखतींचे आणि परिचय असणारे ‘गुण घेईन आवडी- संवाद गानगुरूंशी‘ हे पुस्तक जुलै 2022 मध्ये प्रकाशित झाले. या गुरूंना मिळालेल्या तालमीतून आणि त्यांच्या चिंतनातून सिद्ध झालेले विचारधन या पुस्तकाच्या माध्यमातून संगीत विद्यार्थी आणि जाणकार रसिकांसाठी उपलब्ध आहे.
‘गुण घेईन आवडी- संवाद गानगुरूंशी‘ या पुस्तकात सर्व ज्येष्ठ कलाकारांनी आपल्या बुजूर्ग गुरूंच कृतज्ञतापूर्वक स्मरण केले आहे.त्याच वाटेवर आता पुढे,आत्ताच्या पिढीतील या गुरूंच्या शिष्यांनी आपल्या गुरूने दिलेला संस्कार आपण कसा जपला आणि पुढे नेण्याचा प्रयत्न केला याविषयी विचार मांडण्यासाठी ’गुण घेईन आवडी’ ही एक कार्यक्रम मालिका या महिन्यापासून सुरू होत आहे. यामधून शिष्य या नात्याने या गुरूंच्या कडून घेतलेल्या संस्कार आणि तालमीमधून मिळालेल्या संग़ीत संकल्पनांचा मागोवा या कार्यक‘मातून जाणून घेता येणार आहे.
या ज्येष्ठ गानगुरूंचे मौलिक संगीत विचार त्यांच्या शिष्यांकडून सप्रात्यक्षिक ऐकण्याची संधी ’गुण घेईन आवडी’ ह्या कार्यक‘मामधून संगीत अभ्यासक व जाणकार रसिकांना मिळणार आहे. या मालिकेतील पहिले पुष्प गुरूवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी ६ वाजता गांधर्व महाविद्यालय येथे गुंफले जाणार आहे.