नांदेड| मुदखेड तालुक्यातील मौजे पिंपळकौठा (मगरे) येथे आज बुधवारी सकाळी ९.३० वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधीसत्व डॉ. बााबसाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार एम.पी. वाघमारे यांनी दिली.
दि. ११ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ठिक ८ वाजता पिंपळकौठा (मगरे) गावातील प्रमुख रस्त्याने तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता पुज्य भदंत महाविरो थेरो व भिक्खु संघ यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण होईल.
त्यानंतर तक्षशिला बुद्ध विहार पिंपळकौठा (मगरे) ता. मुदखेड येथे तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. १० ते ११ वाजता पुज्यनीय भिक्खु संघाचे भोजनदान व चिवरदान त्यानंतर उपस्थितांना भिक्खु संघाद्वारे पंचशील देऊन धम्मदेशना होईल. या मूर्ती स्थापन कार्यक्रमास पुज्य भदंत महाविरो थेरो, पुज्य भदंत संघपाल थेरो व पुज्य भन्ते जिवक हे उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक, मधूर स्वरांचा बादशहा विजयकुमार पवार व महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सौ. संगीता पवार (गायकवाड) यांचा बुद्ध- भीम गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास गावातील उपासक- उपासिकांसह परिसरातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पिंपळकौठा (मगरे) ग्रामस्थांसह युवा भिम सेना मित्रमंडळ व पत्रकार एम.पी. वाघमारे यांनी केले आहे.