
नांदेड, अनिल मादसवार| भारतीय जनता पक्षाच्या तोडाफोडा व राज्य करा या कुटील नीतीच्या षडयंत्राला आणि आर्थिक खोक्यांच्या आमिषाला बळी पडून शिंदे गटाने गद्दारी करत राज्याची सत्ता मिळवली असली तरी आता मरगळ टाकून या गद्दारांविरुध्द पेटून उठलेला शिवसैनिक वंदनीय बाळासाहेबांचे विचार अंगिकारुन उठला आहे. कात टाकून सळसळत रस्त्यावर आलेला हा शिवसैनिक आता गद्दारांना गाडून राज्यात सत्तांतर आणल्या शिवाय राहणार नाही, असे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी आज येथे केले.


नांदेड जिल्ह्याच्या तीन दिवसाच्या दौर्यावर थोरात हे आले असतांना काही पत्रकारांशी ते बोलत होते. उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्यांच्या बैठकीसाठी थोरात नांदेडला आले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर, माधव पावडे, जिल्हाप्रमुख बबन बारसे, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे हेही यावेळी उपस्थित होते.


थोरात पुढे म्हणाले की, मिंधे गटाच्या गद्दारीमुळे वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांनी झपाटलेला शिवसैनिक पेटून उठला आहे. बाळासाहेबांनी सांगितलेल्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्वाला या अतिमहत्वाकांक्षी गद्दारांनी हरताळ फासला आणि भाजपच्या आर्थिक खोक्यांच्या जाळ्यात हे गद्दार अलगद अडकले. पण या गद्दारांनी केलेला विश्वासघात सामान्य शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला आहे. या गद्दारांना येत्या निवडणुकीत धडा शिकवून त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाही, असेही थोरात म्हणाले.


सत्तांतरानंतर आता नांदेड जिल्ह्यात शिवसेनेची काय स्थिती आहे व जिल्ह्यातील संघटना बांधणीसाठी आपल्या काय योजना आहे? असे विचारले असता ते म्हणाले की, मिंधे गटासोबत गेले ते अति महत्वाकांक्षी गद्दार होते. ते गेले तेच बरे झाले. खोक्यांच्या आमिषाला भुलून वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन जे गेले ते गेले. ते आता इतिहास जमा झाले आहेत. आर्थिक आमिषापोटी त्यांनी आपल्या बापाशी गद्दारी केली असली तरी वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेले शिवसैनिक या गद्दारांसोबत नाहीत. बहुसंख्य शिवसैनिक पेटून उठले असून आता या गद्दारांना हा शिवसैनिक बाहेर फिरु देणार नाही, असेही थोरात यांनी सांगितले.

भाजपच्या कूटनीतीबाबत बोलतांना ते म्हणाले की, भाजपने शिवसेनेसोबत विश्वासघात केला आहे. दिलेला शब्द न पाळणे हे भाजपचे धोरण असून त्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्याला शिवसेनेने शह दिल्याने भाजपच्या अंगाचा तिळपापड झाला व केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करीत भाजपने आर्थिक खोक्यांचे षडयंत्र रचून मिंधे गटाची गद्दारी घडवून आणली. तथापि भाजपचे तोडा-फोडा व राज्य करा हे धोरण फार काळ टिकणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे, असेही थोरात म्हणाले.

जिल्ह्यातील शिवसैनिकांना आपण काय सांगाल असे विचारले असता थोरात म्हणाले की, शिवसैनिकांना मी एवढेच सांगेन की आर्थिक आमिषांसाठी पक्षाशी गद्दारी करुन या मिंधे गटाने सत्ता मिळविली असली तर सत्याचा विजय अटळ आहे. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही. नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेची संघटना बांधणी नव्या जोमाने आम्ही करणार आहोत, असेही थोरात म्हणाले.
