नांदेड| रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणार्या राजमाता जिजाऊ यांची प्रेरणा प्रत्येक समाजातील स्त्रीला मिळावी या उद्देशातून नांदेड शहरात भव्य जिजाऊ सृष्टी (उद्यान) साकारले जात आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकारातून निधी उपलब्ध करून दिला असून राजमाता जिजाऊ सृष्टीचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी संचालक अविनाश कदम यांनी दिली.
नांदेड शहरात मनमोहक अशा उभारण्यात येत असलेल्या राजमाता जिजाऊ सृष्टीचे काम माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, विधान परिषदेचे गट नेते अमरनाथ राजूरकर, माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास येत आहे. नांदेड शहरात उभारण्यात येत असलेली जिजाऊ सृष्टी ही जिजाऊप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. तसेच महिलांसाठी प्रेरणादायी असणार आहे. हनुमान गढ जानकीनगरात उभारण्यात येत असलेल्या जिजाऊ सृष्टीचे काम पूर्णत्त्वास नेण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्यांच्या पुढाकारामुळेच जिजाऊ सृष्टी पूर्णत्वास येत असल्याची माहिती कदम यांनी दिली.
राजमाता जिजाऊ सृष्टी उद्यानमध्ये नामवंतांनी रेखाटलेल्या कलाकृती उभारण्यात येत आहेत. तसेच मुलीसाठी अद्यावत अभ्यासिका, वाचनालय, म्युरल आर्टचा वापर, मावळे, तोफांची प्रतिकृती, लेझर शो, आकर्षक विद्युत रोषणाई, शोभेची झाडे राहणार असून अबालवृद्धांसाठीही जिजाऊ सृष्टी आकर्षक ठरणार आहे. नांदेड शहरातील जिजाऊ सृष्टी महाराष्ट्रातील एक देखणे आणि प्रेक्षणीय ठिकाण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत या ठिकाणाला भेट दिल्यानंतर राज्यातील इतर ठिकाणी या सृष्टीची प्रतिकृती निर्माण होईल, अशी आशाही अविनाश कदम यांनी व्यक्त केली.
प्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ श्रीमंत कोकाटे यांच्या संकल्पनेतून जिजाऊंच्या जीवनप्रसंगाची आकर्षक कलाकृती पुणे येथील प्रख्यात चित्रकार दिलीप कदम यांच्या कुंचल्यातून साकारण्यात आली आहे. नांदेड येथील शिल्पकार प्रा.व्यंकट पाटील हे जिजाऊंच्या जीवनावर आधारित म्युरल साकारत असून, राजमाता जिजाऊ सृष्टीचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. तसेच लोकसहभागातून बाल शिवाजी व राजमाता जिजाऊंचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचा मनोदयही अविनाश कदम यांनी व्यक्त केला आहे.
याकामी तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विपीन ईटनकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त सुनील लहाने, अप्पर आयुक्त गिरीश कदम, माजी सभापती किशोर स्वामी, नगरसेवक आनंद चव्हाण, दयानंद वाघमारे, सौ.सरिता बिरकले, वास्तू विशारद इंजि.गणेश मोरे, उपअभियंता दिलीप टाकळीकर, शाखा अभियंता संदीप पाटील, गुत्तेदार शिवाजी इंगळे यांचाही सहकार्याबद्दल आवर्जून उल्लेख केला.