
नांदेड| युवकांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि आदर्श घेऊन स्वविकासाबरोबर राष्ट्राच्या विकासासाठी कार्य करावे आणि त्यांच्या साहित्याचे सर्वानी वाचन करावे असे आवाहन हदगाव येथील श्री दत्त महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ. नितीन आनभुले यांनी केले.


भारत सरकाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील क्षेत्रीय संचार ब्युरो व शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रम प्रसंगी डॉ. आनभुले बोलत होते.


या प्रसंगी व्यासपीठावर शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.के. पाटील, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. विक्रम कुंटूरवार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. बिराजदार, डॉ. पठाण, केंद्रीय संचार ब्युरोचे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रचार अधिकारी, सुमीत दोडल आदी मान्यवर उपस्थित होते.


स्वामी विवेकानंद यांचा सामर्थ्यावर प्रचंड विश्वास होता. सामर्थ्य व ज्ञान म्हणजे जीवन, दुर्बलता व अज्ञान म्हणजे मृत्यू हि त्यांची शिकवण सर्वांनी आत्मसात करून प्रेरणा, चैतन्य आणि उत्साहपूर्ण जीवनाचा अवलंब करून यशाकडे वाटचाल करावी असेही आनभुले पुढे म्हणाले.

या प्रसंगी प्राचार्य पाटील यांनी आपले विचार मांडताना, स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि आदर्श अत्यंत सोप्या शैलीमध्ये विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले. तसेच त्यांनी संपूर्ण जगाला विश्व बंधुत्वाची हाक दिली असे सांगून चारित्र्यवान जीवन आचरणाची गरज व्यक्त केली. शाहिर रमेश गिरी यांच्या शिवशक्ती कला मंचाने देशभक्तीपर गीताचे सादरीकरण करून सर्व उपस्थितांचे मने जिंकली.

या युवा दिना निमित्त विविध क्रीडा, रांगोळी आणि निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव जायभाये यांनी तर सूत्रसंचालन डॉ. साईनाथ शेटोड व आभार प्रदर्शन डॉ. पठाण यांनी केले.
