
हजुरसाहिब नांदेड येथील पवित्रपावन तखतची सेवा करण्याचे भाग्य संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्या नशिबी होते. पाहता – पाहता जत्थेदार पदावर बाबाजींनी 23 वर्षे सेवापूर्ति केली. शीख पंथाचे श्रद्धास्थान तखत सचखंड श्री हजुरसाहिब येथील जत्थेदार म्हणून त्यांना दि.13 जानेवारी, 2000 रोजी एका कठीण आणि अपरिहार्य परिस्थितीत त्यांना आधिकारिकपणे सेवेत समाविष्ट करण्यात आले. त्यांच्या पूर्वीचे जत्थेदार संतबाबा हजुरासिंघजी धूपिया बाबाजी यांचे दि.12 जानेवारी, 2000 रोजी रात्रीच्या वेळी देहावसान घडले आणि संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्यावर खांद्यावर अचानकपणे श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या सिंहासन साहिब, श्री गुरु ग्रंथसाहिब महाराज यांची सेवा आणि तखतसेवेची जवाबदारी एकाचवेळी आली. एक तरुण जत्थेदार म्हणून त्यांची चर्चा सर्वत्र झाली. अगदी तरुणपणात त्यांना जत्थेदार पदावर नियुक्ती मिळाल्याने एका वैभवपर्वाची सुरुवात हजुरसाहिब मध्ये झाली.


देशातील शीख धर्मियांच्या पाच तखतापैकी हजुरसाहिब येथील तखतसाहिबची सेवा भिन्न अशी आहे तसेच कठीण सुद्धा आहे. पहाटे तीन वाजता पासून रात्रि 9 वाजे पर्यंत गुरुद्वारात पूजापाठ, धार्मिक विधी आणि धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा ठरलेली असते. वेळेप्रमाणे सर्वप्रकारची सेवा करणे भागच होय.


जत्थेदार पदावर असलेल्या व्यक्तीस सतत सहा तास झोपण्याची संधी मिळत नाही. पहाटे 3 वाजता गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या सिंहासन स्थानाचे स्नान असते. त्यानंतर श्री गुरु ग्रंथसाहिब, श्री दशम ग्रंथसाहिब आणि इतर धार्मिक ग्रंथांचे प्रारंभ, गुरुबाणी कीर्तन, भोग, अरदास व इतर कार्यक्रमांच्या संचालनात भूमिका पार पाडावी लगते. गेली 23 वर्षे सतत सेवेची जवाबदारी परमेश्वराने त्यांच्याकडून करून घेतली म्हणावे लागेल. वरील सेवा करीत असतांना सामाजिक कार्यक्रम, समाजाच्या सुखात – दुःखात त्यांना वेळ द्यावा लागतो. एवढं सगळं दिव्य संसार संचालन करतांवेळी बाबाजी आपल्या आईसाठी आवर्जूनपणे वेळ काढतात हे मला मुद्दामहून नमूद करायचे आहे.


मागील तेरा वर्षापासून अबचलनगर कॉलोनित मी बाबाजींच्या घराच्या शेजारी वास्तव्यास आहे. आणि मला अति जवळून बाबाजींचे मातृप्रेम म्हणा की आई वरील श्रद्धा म्हणा पाहण्याचा वारंवार योग आला आहे. दुपारी 12 च्या दरम्यान तखत येथील सेवा पूर्ण करून संतबाबा कुलवंतसिंघजी आईच्या भेटीसाठी अबचलनगर कॉलोनित पोहचतात. एक ते दीड तास वेळ आई संतकौर यांच्या स्नेहात ते घलवातात. पंचयातहरी ओलांडलेल्या आईची काळजी ते घेतात. खरं तर आजच्या पिढीसाठी बाबाजींचे मातृप्रेम एक आदर्श उदाहरण होय.

बाबाजींच्या रात्रंदिवस धावपळीच्या जीवनात त्यांचे सहायक जत्थेदार संतबाबा रामसिंघजी यांचे सहकार्य देखील महत्वाचे आहे. तसेच बाबाजींचे मोठे बंधु गुरुद्वाराचे सहायक अधीक्षक स. हरजीतसिंघ कडेवाले यांचे देखील सहकार्य मिळत असल्याने आणि आई साहेबांचे आशीर्वाद लाभत असल्यामुळे बाबाजींना खूपकाही करण्याचे आत्मबळ लाभते. आईच्या संघर्षामुळे, वात्सल्यामुळे संतबाबा कुलवंतसिंघजी यांना परमेश्वराने मोठी संधी दिली आहे. बाबाजींना शीख जागतातील सर्वात सक्षम शक्तिशाली सिख म्हणून वैश्विकस्तरावर पहिला स्थान प्राप्त आहे. संतबाबा कुलवंतसिंघजी दि. 13 जानेवारी रोजी सेवेच्या 24 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांना आभाळभर शुभेच्छा देत शीख पंथासाठी बाबाजींचे योगदान सतत राहावे ही परमेश्वराचरणी प्रार्थना आहे.
…..स. रविंद्रसिंघ मोदी, पत्रकार,नांदेड.
