
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत मागील पंचवार्षिक काळात इदगाह मैदान बांधकाम करण्यात आले. परंतु या बांधकामात मोठा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला आहे. हि बाब लक्षात घेता धर्मीक स्थळाच्या नावाखाली झालेल्या आर्थिक गैरव्यव्हारची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते बाबा खान उर्फ मोहम्मद इम्तियाज यांनी एका निवेदनाद्वारे आयुक्ताकडे केली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर शहराला मागील ७ वर्षांपूर्वी नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. त्यामुळे हिमायतनगर शहराचा विकास होऊन शहरातील नागरी समस्या मिटतील हंसी अपेक्षा सर्वसामान्य जनतेची होती. मात्र मागील पंचवार्षिक काळात शेकडो कोटीची विकास कामे करण्यात आली. मात्र त्या विकास कामाच्या नावाखाली तत्कालीन पुढार्यांनी आणि काही अधिकाऱ्यांनी स्वतःचा विकास करून घेत शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. याचे जिवंत उदारहन पाहायचे झाले तर हिमायतनगर शहरातील रस्ते, नाल्या, स्वच्छता आणि इतर कामाच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर दिसून येत आहे. असाच कांहींसा प्रकार शहरातील धार्मिक स्थळाचा कोट्यवधींच्या निधीतून करण्यात आलेल्या विकास कामाच्या बाबतीतही दिसून येतो आहे.


हिमायतनगर येथील नगरपंचायत अंतर्गत सन 2017 काळात गणेशवाडी परिसरातील इदगाह मैदान बांधकामसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला होता. त्यानूसार इदगाह मैदान बांधकाम व ओट्याचे बांधकाम करण्यात आले होते. सदर काम नगरोत्थान योजने अंतर्गत पुर्ण झाले आणि त्याचे रितसर देयके गुत्तेदाराला देण्यात आले होते. असे असताना देखील नगरपंचायतचे काही अधिकारी कर्मचारी व इतर लोकप्रतिनिधींनी संगनमताने षड्यंत्र करून पुर्वीच झालेले बांधकाम पुन्हा दलितेत्तर योजना भासवून सन 2018/2019 मध्ये शासन स्तरावर दाखवून शासन व जनतेची दिशाभूल व फसवणूक केली आहे.


शासनाला केलेल्या कमला दाखवून नव्याने संबंधित इदगाह मैदानाच्या जागेवर कोणतेही अतिरिक्त बांधकाम करण्याची आवश्यकता नसताना कागदोपत्री काम दाखवून शासनाकडून एकूण 43 लक्ष 91 हजार 686 एवढा मोठा निधी मंजूर करून घेतला. त्यानंतर प्रशासक लागू झाल्यावर हा निधी सबंधित गुतेदाराला परस्पर देऊन अपहार केला असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हण्टले आहे. हा सर्व गैरव्यवहार पाहता शासन व जनतेच्या निधीवर डल्ला मारणाऱ्या संबंधिताच्या गैरव्यवहार व अपहाराची रितसर तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते मोहम्मद इम्तियाज (बाबा खान ) यांनी औरंगबाद आयुक्तालय तथा परदेशीक संचालक नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे १९ ऑगस्ट २०२२ रोजी दिली होती.

त्यानंतर वरिष्ठांकडून जिल्हाधिकारी व संबंधित नगरपंचायत हिमायतनगर याना चौकशीचे आदेश मिळाले, मात्र या गैरव्यवहार प्रकारांची चौकशी थातुर माथूर करून धार्मिक स्थळाच्या नावाखाली करण्यात आलेल्या गैरव्यवहारचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते मोहम्मद इम्तियाज यांनी केला असून, या प्रकरणी सबंधित अपहार कर्त्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी त्यांनी पुन्हा वरिष्ठाना पत्र देऊन केली आहे. यावरही कारवाई न झाल्यास हे प्रकरण न्यायालयात दाद मागणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते मोहम्मद इम्तियाज (बाबा खान ) यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना सांगितले.
