
नांदेड| शहरात आकारास येत असलेल्या राजमाता जिजाऊ सृष्टी ही मातृशक्तीचे नवे विद्यापीठ असेल यातून समाजास प्रेरणा मिळेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला. शहराच्या जानकी नगर हनुमानगड लगत राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश कदम यांच्या संकल्पनेतून भव्य जिजाऊ सृष्टी (उद्यान) साकारले जात आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकारातून निधी उपलब्ध करून दिला असून राजमाता जिजाऊ सृष्टीचे काम अंतिम टप्प्यात आहे.


राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त गुरुवारी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी राजमाता जिजाऊ सृष्टीच्या कामाची पाहणी केली. यावेळी माजी मंत्री डी.पी.सावंत, आ.मोहनराव हंबर्डे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, वरिष्ठ उपाध्यक्षा मिनलताई खतगावकर, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी संचालक अविनाश कदम, माजी नगरसेवक आनंद चव्हाण, दयानंद वाघमारे, विठ्ठल पावडे, श्याम कोकाटे, राम सोळंके, प्रवीण कानगुले, गजानन सावंत, प्रा.संतोष देवराये, दीपक पावडे, शशिकांत क्षिरसागर, भुम्मना अक्केमवाड, रमेश चित्ते, किरण पडलवार, नितीन दरमोड व दिलीप माहोरे पाटील यांची उपस्थिती होती.


यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी उभारण्यात येत असलेल्या राजमाता जिजाऊ सृष्टीच्या कामांची पाहणी केली. हे काम गतीने व दर्जेदार व्हावे अशा सूचना करत झालेल्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. शहरात उभारण्यात आलेले महापुरुषांचे पुतळे समाजास कायम प्रेरणा देणारे असून राजमाता जिजाऊ सृष्टीही शहराच्या ऐतिहासिक वैभवात भर पडणारी ठरणार आहे. ही जिजाऊ सृष्टी नव तरूण तरुणींसाठी एक संस्काराचे विद्यापीठ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


या जिजाऊ सृष्टीचे काम संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देणारे ठरेल असाही विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला. या प्रसंगी वास्तू विशारद गणेश मोरे, शिल्पकार व्यंकट पाटील, उपअभियंता, दिलीप टाकळीकर, शाखा अभियंता संदीप पाटील, कंत्राटदार शिवाजी इंगळे, उमाकांत पोतदार, महेश शुक्ला, हनुमान राजेगोरे, संतोष पंदीलवाड, बाबूभाई मिस्त्री, नाहीद पेंटर, नबु भाई, गोविंद कदम, खंडू राजेगोरे, मुजाह्दि आदींची उपस्थिती होती.
