
पुणे| भारती विद्यापीठाचे संस्थापक स्व.डॉ पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एक दिवसीय सायबर सिक्युरिटी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंटच्या वतीने आयोजित कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला.


सायबर सिक्युरिटी तज्ञ संदीप गादिया यांनी मार्गदर्शन केले .अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.विदुला सोहोनी या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होत्या. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ.के.बी.सुतार यांनी कार्यशाळेचे निमंत्रक या नात्याने संयोजन केले .प्रा युवराज थोरात यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ.दत्ता जाधव यांनी स्वागत केले.डॉ. महेश पाटील यांनी आभार मानले. विविध संस्थांमधील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेत भाग घेतला.


संदीप गादिया म्हणाले, ‘आगामी युद्ध हे माहितीचे युद्ध असणार आहे. त्यासाठी डेटा आणि माहिती -तंत्रज्ञान याबद्दल प्रत्येकाने अद्ययावत राहिले पाहिजे. सायबर हल्ले ,सायबर गुन्हे वाढत असून त्याला तोंड देण्याची तयारी सर्वांनी ठेवली पाहिजे. एसएमएस, एम एम एस, कॉलिंग, सिमकार्ड यांच्याशी संबंधित अनेक गुन्हे असून त्याबाबत सजग राहिले पाहिजे. त्यापासून बचाव करण्याचे तंत्रज्ञान शिकून घेतले पाहिजे’ .


डॉ. विदुला सोहोनी म्हणाल्या, ‘सायबर हल्ले हा महत्त्वाचा विषय असून केवळ अँटीव्हायरस सॉफ्टवेअर मुळे त्यापासून बचाव होऊ शकणार नाही. त्या पलीकडे जाऊन आपण सुसज्ज झाले पाहिजे. याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
