
पुणे| विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संस्थेच्या पुणे शाखे तर्फे स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘उत्तिष्ठत भारत ‘ या विषयावर शिरीष आपटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.


हे व्याख्यान गुरुवार, दिनांक १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता येथे झाले. या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला. विवेकानंद केंद्राच्या वतीने जयंत कुलकर्णी यांनी स्वागत केले. किरण किर्तने, जयंत कुलकर्णी,सुहासिनी राणे व्यासपीठावर उपस्थित होते. अॅड.अंजली भाडळे यांनी प्रास्ताविक केले. गौरी ढापरे यांनी आभार मानले. सुश्रुत जोशी यांनी सूत्रसंचालन केले.


शिरीष आपटे म्हणाले,’ स्वामी विवेकानंद हे जसे बोलत, तसेच वागत. त्यामुळे ते अनुकरणीय, आदरणीय व्यक्तीमत्व ठरले. त्यामुळे त्यांचा प्रभाव त्यांच्यानंतरही टिकून आहे. मनगट, मेंदू आणि मन तरुण असतो, तोच तरूण असतो, अशी तरुणाची व्याख्या विवेकानंद यांनी केली. ती आजच्या युवा दिनी लक्षात ठेवली पाहिजे.


शिकागोला विवेकानंद यांची एकूण १५ भाषणे झाली. यातील एका भाषणात ‘ बियाँड टॉलरन्स् ‘ असा शब्द आला आहे. हिंदू धर्माचे वर्णन करताना विवेकानंद म्हणतात, ‘ आपला धर्म सहिष्णू आहेच, पण त्या पलिकडे अजून काही आहे ‘ असे सांगतात.विवेकानंदांच्या सर्व संदेशांचे सार लक्षात ठेवले पाहिजे.’भारत को जानो, भारत को मानो, भारत के बनो, भारत के बनाओ ‘ हा विवेकानंदांचा संदेशही लक्षात ठेवला पाहिजे.त्यानुसार स्वतःच्या जीवनात, परिसरात वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हीच राष्ट्र निर्मिती आहे. त्यापेक्षा वेगळे काही नाही, असेही आपटे यांनी सांगितले.
