
माहूर,राज ठाकूर| शहरापासून ३कि,मि,अंतरावरील पुसद रोड उखळी घाटातील जंगलात झाडाला गळफास घेतलेला मृतदेह रविवार दिनांक १५ रोजी सकाळी १० वा, आढळून आला आहे. सदर मयताची ओळख पटली असून मृतक वसमत तालुक्यातील सोमठणा जिल्हा परिषद शाळेत कार्यरत बबनराव किशनराव डाढाळे वय ५६ वर्ष यांचा हा मृतदेह असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


माहूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर मागील ३ दिवसा पासून एक ग्रे रंगाची एक्स्टिवा स्कुटी क्रमांक एम.एच.३८ झेड ५७२४ ही बेवारस उभी होती.या विषयी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी गाडी च्या क्रमांकावरून प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी सदर वाहन क्रमांका सोबत लिंक असलेला भ्रमणध्वनी क्रमांक त्यांना दिला.त्या वरून सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी त्या क्रमांकावर संपर्क करून आपल्या परिवारातील कोणी मिसिंग आहे का….? या विषयी खातर जमा केली असता त्यांना बबनराव किशनराव डाढाळे हे तीन दिवसापासून घरून निघून गेल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या परिवाराने शुक्रवार दिनांक १३ रोजी हरवल्याची वसमत पोलिसात तक्रार दाखल केल्याचे माहिती ही दिली.


मृतक बबनराव किशनराव डाढाळे वय ५६ वर्ष रा. मयुर नगर वसमत हे वसमत तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक या पदावर कार्यरत होते. दि. १३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास अॅक्टीव्हा स्कुटी ने सोमठाणा येथील शाळेत जातो म्हणून घरून गेले पण ते शाळेत पोहचलेच नाही व दररोजच्या वेळेनुसार घरी परतले नसल्याने घरच्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद आढळून आला. तेव्हा परिवारातील सदस्यांनी शाळेतील इतर शिक्षकांशी संपर्क साधला असता डाढाळे हे शाळेत आलेच नसल्याचे शिक्षकांनी सांगीतले.


तेंव्हा परिवारातील सदस्यांनी त्यांचे स्नेही, मित्र तसेच नातलग यांच्याकडे मोबाईलद्वारे संपर्क केला पण ते आले नसल्याची माहिती मिळाली. तसेच परिवारातील सदस्य व नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही ते मिळुन न आल्याने शेवटी वसमत शहर पोलीसात बबनराव डाढाळे गुरूजी हे हरवले असल्याची नोंद केली होती.आज त्यांचा मृतदेह माहूर च्या उखळी घाटात आढला. जमादार आनंद राठोड यांनी पंचनामा केला माहूरच्या ग्रामीण रुग्णालयातील वैघकिय अधिकारी डॉ, बोडके यांनी शवविच्छेदन करुन प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात दिले पुढिल तपास पोनि नामदेव रिठ्ठे याच्या मार्गदर्शनात सूरु आहे.
