नांदेड| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे एसटीच्या व देशाच्या प्रगतीसाठी आधुनिकीकरण वाहनाच्या काळात इंधन बचत करणे ही काळाची गरज आहे. या उदात्त हेतूने एसटी महामंडळ नांदेड विभागाने जिल्ह्यातील एसटीच्या ९ आगारात चालक- यांत्रिक व इतर सर्व कर्मचार्यांमध्ये जनजागृती होऊन आपण इंधन बचत करु शकतो.
या हेतूने दि. १६ जानेवारी २०२३ ते १५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान इंधन बचत मासिक कार्यक्रम अभियान चालू केलेले आहे. याचाच एक भाग म्हणून एसटी डेपो नांदेड आगार येथे दि. १६ जानेवारी २०२३ सोमवार रोजी सकाळी ठिक ११ वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी मोहन कलंबरकर, शिल्पनिदेशक मनोज उदबुके यांच्या हस्ते या इंधन बचत मासिक कार्यक्रमाची फित कापून उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक आशिष मेश्राम हे होते तर विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून विभाग नियंत्रक मंगेश कांबळे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक हनमंतराव ठाकूर, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, चार्जमन विष्णू हरकळ, शिवाजीराव मगर, वाहतुक निरीक्षक आकाश भिसे, सुधाकर घुमे, विठ्ठल इंगळे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, वरिष्ठ लिपीक राजेश गट्टु, नितीन मांजरमकर यांची उपस्थिती होती.
यावेळी उद्घाटकीय भाषणामध्ये मोहन कलंबरकर यांनी आपले विचार मांडले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, वाहन सावकाश चालवून वाहनांची योग्य ती देखभाल करुन आपण इंधन बचत करु शकतो, असे प्रतिपादन केले. पुढे बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की, डिझेल, पेट्रोल हे आपल्याला आयात करावे लागते. आताचे दर हे गगणाला भिडले असून आपण सर्वांनीच वाहनांची सर्व्हीसींग करुन लोकजागृती करुन सर्वांच्या सहभागाने इंधन बचत करु शकतो, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी विचारमंचावरील सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. शेवटी अध्यक्षीय समारोप आशिष मेश्राम यांनी केले व कामगार- कर्मचार्यांना इंधन बचतीबात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन नितीन मांजरमकर यांनी मांडले. या कार्यक्रमास आगारातील कामगार- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.