
पुणे| ‘पं.कमलाकर जोशी शिष्यपरिवाराने आयोजित केलेल्या ‘’गुण घेईन आवडी’ कार्यक्रम मालिकेतील पहिल्या पुष्पात पं. शरद साठे आणि पं. अरूण कशाळकर यांचे शिष्य मुकूल कुलकर्णी ,विशाल मोघे यांनी बहारदार गायन सादर केले. यावेळी या गुरुंच्या मुलाखतीची चित्रफीत दाखवल्यानंतर या शिष्यांनी गुरुशिष्य परंपरेतून आपण कसे घडलो हे सांगताना आपल्या गुरुंच्या सांगीतिक विचारांचेही सप्रात्यक्षिक दर्शन घडवले.गांधर्व महाविद्यालय, मेहुणपुरा येथे १२ जानेवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला.


सुरवातीला विशाल मोघे यांनी श्री रागात नोम-थोम करून झपतालातली ‘गरीब नवाज’ ही बंदिश आणि त्रितालातील ‘मन लागा तुमीसन ही बंदिश गायली. एकच बंदिश अनेक तालात कशी येते याचे प्रात्यक्षिक त्यांनी बिहाग रागातील ‘धन धन रे’ ही बंदिश तिलवाडा, झुमरा, रूपक, झपताल आणि एकताल या तालामध्ये सहजरित्या गाउन दाखवले. त्यानंतर जयजयवंती रागातील बंदिश गाउन आपले गाणे संपवले.


उत्तरार्धात मुकुल कुलकर्णी यांनी यमन रागातील ‘जिया करो कोट’ ही एकतालातील बंदिश व ‘धरकन लागी’ या पं. शरच्चंद्र आरोळकरांची बंदिशी म्हणल्यानंतर आपले गुरू पं शरद साठे यांनी बंदिशीच्या अंगाने गाणे गायला कसे शिकवले याचे प्रात्यक्षिक द्रुत एकतालातला तराना आकर्षक रीतीने सादर करून दिले. जोडरागाचे उदाहरण देताना त्यांनी भैरव-बहार रागातला तिलवाडा तालातील ख्याल पेश करून नंतर पश्तो तालातील भैरवी रागातील टप्पा गाउन मैफिलीची सांगता केली. त्यांना अरविंद परांजपे (तबला),शुभदा आठवले(संवादिनी) यांनी साथ संगत केली. संपदा थिटे यांनी कलाकारांशी संवाद साधला. गंधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पं. प्रमोद मराठे यांनी सर्व कलावंतांचे स्वागत केले.


ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गुरू पं.कमलाकर जोशी ह्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या दिग्गज कलाकार व गुरूंच्या मुलाखतींचे आणि परिचय असणारे ‘गुण घेईन आवडी- संवाद गानगुरूंशी‘ हे पुस्तक जुलै 2022 मध्ये प्रकाशित झाले. या गुरूंना मिळालेल्या तालमीतून आणि त्यांच्या चिंतनातून सिद्ध झालेले विचारधन या पुस्तकाच्या माध्यमातून संगीत विद्यार्थी आणि जाणकार रसिकांसाठी उपलब्ध आहे.या पुस्तकात सर्व ज्येष्ठ कलाकारांनी आपल्या बुजूर्ग गुरूंच कृतज्ञतापूर्वक स्मरण केले आहे. आपल्याला मिळालेला हा वारसा या गुरूंचे शिष्य कसा पुढे नेत आहोत याविषयीचे सप्रयोग विवेचन गुण घेईन आवडी’ या मालिकेच्या पुढील भागातही सादर होणार आहे.या दोघांचे गाणे ऐकून वैभवशाली परंपरा असलेली घराणेदार गायकी पुढेही गायली जाईल असे आश्वासन उपस्थित रसिकाना मिळाले.
