
पुणे| हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी, आणि डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय धर्म विषयक वक्तृत्व स्पर्धेचे शनिवार, दि. १४ जानेवारी २०२३ रोजी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २७० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी खुली होती. स्पर्धा उर्दू, मराठी आणि इंग्रजीमध्ये संबंधित वर्गानुसार चार गटांतर्गत पार पडली.


कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ, हैदराबादचे माजी कुलगुरू डॉ. मोहम्मद अस्लम परवेझ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार हे होते. डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा आणि महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा श्रीमती आबेदा इनामदार यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. इस्लामिक मूल्यांशी तडजोड न करता समकालीन वैज्ञानिक पद्धतींनी विद्यार्थ्यांचे वैचारिक संवर्धन करण्यासाठी डॉ. परवेझ यांनी डॉ पी. ए. इनामदार यांची व श्रीमती आबेदा इनामदार यांनी घेतलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. समकालीन काळात इस्लामच्या प्रासंगिकतेकडे लक्ष केंद्रित केल्याबद्दल कौतुक केले.


इयत्ता पाचवी ते सातवी गटाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘वेळेच्या व्यवस्थापनाचे महत्व आणि गरज’; इयत्ता आठवी ते दहावी गटाच्या करिता ‘राष्ट्र निर्मितीत विद्यार्थ्यांची भूमिका’; इयत्ता ११वी, १२ वी व डी. एड. महाविद्यालाय गटाच्या करिता- ‘सद्यपरिस्थितीत धार्मिक शिक्षणाचे महत्त्व’ आणि पदवी व व्यावसायिक महाविद्यालय गटाच्या करिता ‘आजच्या तरुणांसमोरील शैक्षणिक आव्हाने’ असे विषय देण्यात आले होते.


वक्तृत्व स्पर्धेत एकूण २७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व स्पर्धक अतिशय उत्साही आणि उत्तम तयारीनिशी स्पर्धेत सहभागी झाले होते. इयत्ता पाचवी-सातवी इयत्ता आठवी-दहावी, अकरावी, बारावी आणि डी.एड. पदवी आणि व्यावसायिक महाविद्यालये या प्रत्येक श्रेणीत विजेते घोषित करण्यात आले आहेत. हा कार्यक्रम अभूतपूर्व यशस्वी झाला.
