
नांदेड। तृतीयपंथीयांमध्ये दोन गट पडल्यामुळे भिक्षा मागण्याच्या कारणावरून दोन्ही गटामध्ये खटके उडत आहेत. लाल बावटा मध्ये असलेल्या तृतीय पंथीयांना मदत आणि भिक्षा मागण्यावर इतर गटाचे किन्नर बळजबरीने रोख लावत असून काही पदाधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या जात असल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकारी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि पोलीस अधीक्षक नांदेड यांना लाल बावटा संघटनेच्या लेटरपॅड दिनांक १३ जानेवारी रोजी देण्यात आली होती. निवेदनाची प्रत पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे विमानतळ यांना देखील माहितीस्तव देण्यात आली होती.


सन २०२१ मध्ये माकप सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तृतीयपंथीयांच्या जिवमरणाच्या मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय,मनपा आयुक्त आणि सहाय्यक समाज कल्याण आयुक्त यांच्या कार्यालयासमोर अनेक आंदोलने करून बऱ्याच मागण्या सोडविण्यासाठी प्रशासनास भाग पाडले आहे. ट्रान्सजेन्डर महाविकास जनआंदोलन (लाल बावटा) ने राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पाठपुरावा करून तृतीयपंथीयांना चांगले दिवस आणले होते परंतु अंतर्गत गटबाजीमुळे लाल बावटा संघटनेसी संलग्न असलेल्या तृतीयपंथीयांना भिक्षा मागण्यास इतर गटाचे लोक बेकायदेशीर रित्या रोख लावत आहेत.


ह्यावर तोडगा काढावा म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लाल बावटाच्या वतीने दि.१६ जानेवारी रोजी समाज कल्याण कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले. तृतीयपंथीयांचे दोन्ही गट समोरासमोर येण्याची शक्यता असल्यामुळे विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन येथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.


तृतीयपंथी जिल्हा तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव डॉ.तेजस माळवदकर यांनी तातडीने बैठक लावण्यात येईल आणि योग्य तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिल्यामुळे धरणे आंदोलन थांबविण्यात आले. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ.माळवतकर यांनी तृतीयपंथी समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत तसेच पोलीस अधीक्षक आणि इतरही अधिकारी या समितीमध्ये असल्यामुळे त्यांच्या समक्ष बैठक लावून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी माकप नेते कॉ.विजय गाभणे, कॉ.उज्वला पडलवार, कॉ.करवंदा गायकवाड तसेच ट्रान्सजेन्डर महाविकास जन आंदोलनाचे अध्यक्ष कॉ. गंगाधर गायकवाड,उपाध्यक्ष गौरी किन्नर,सचिव कॉ. मगदूम पाशा, कार्याध्यक्ष कॉ.मारोती केंद्रे, कॉ. सुभाषचंद्र गजभारे यांच्यासह अनेक तृतीयपंथीनी सहभाग घेतला होता.
