
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मौजे टेम्भी माळानजीकच्या एका शेतातून शेततळे करण्याच्या नावाखाली रेल्वेच्या गुत्तेदारामार्फत मुरुमाच्या गौण खनिजाचे उत्खनन संबंधित शेतकरी व महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून केले जात आहे. यातही संबंधितांनी गौण खनिज अधिनियमास बगल देऊन रात्रीला देखील मुरूम काढण्याचा प्रयत्न चालू केला आहे. या ठिकाणी होत असलेल्या अनधिकृत रित्या मुरूम उत्खनन प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करावी. आणि याकामी वापरण्यात आलेले टिप्पर, जेसीबी आणि इतर वाहने जप्त करून गौण खनिजाच्या चोरीला आळा घालावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद इम्तियाज उर्फ बाबा खान यांनी केली आहे.


गेल्या काही महिन्यापासून हिमायतनगर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात मुरुमाच्या गौण खनिजाचे उत्खनन केले जात आहे. काही ठिकाणी अल्प ब्रास उत्खननाची रॉयल्टी काढण्यात आली. तर काही ठिकाणी विना रॉयल्टी गौण खनिजाचे उत्खनन करून शासनाला चुना लावला जात आहे. सध्या नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनी गौण खनिज माफियांविरोधात मोहीम उघडली आहे. त्यानुसार हिमायतनगर तालुक्यातील मौजे पिछोण्डी परिसरात मुरुमांसह दोन वाहने पकडून नायब तहसीलदार अनिल तामसकर यांनी नुकतीच कार्यवाही केली. त्यानंतर देखील सिरंजनी रोड, पळसपूर रोड, सोनारी फाटा, विरसनी परिसरात मुरुमाचे गौण खनिज काढून शासनाला चुना लावला जात आहे.


असाच गौण खनिज उत्खननाचा प्रकार हिमायतनगर शहरानजीक असलेल्या मौजे टेम्भी माळा नजीकच्या एका शेतात शेततळे बनविण्याच्या नावाखाली रेल्वेच्या गुत्तेदारामार्फत गौण खनिज अधिनियम १९९५ च्या नियमांचे उल्लंघन करून उत्खनन केल जात आहे. खरे पाहता गौण खनिज उत्खननाची रॉयल्टी काढली असली तरी सूर्योदय ते सूर्यास्तापूर्वी गौण खनिजाचे उत्खनन करावे असे नियम आहेत. मात्र शनिवारी आणि रविवारी या ठिकाणाहून शेततळे करण्याचे नाव दाखवून उत्खननाची वेळ संपल्यानंतर थेट सूर्यास्तानंतर देखील मुरुमाचे उत्खनन जेसीबी मशीनच्या सहाय्याने केले जात आहे. एव्हडेच नाहीतर टिप्परच्या माध्यमातून रेल्वेच्या कामासाठी गुत्तेदार येथील उत्खनन केलेला मुरूम वापरात असल्याचे उघड झाले आहे.


या ठिकाणी केवळ अल्प प्रमाणात म्हणजे केवळ ५० ब्रास उत्खननाला हिमायतनगर तहसील कार्यालयाने परवानगी दिली आहे. मात्र परवानगीपेक्षा कितीतरी पटीने येथे मुरुमाचे उत्खनन केल्या गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर फुले नगर येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद इम्तियाज उर्फ बाबा खान यांनी उत्खनन होत असलेल्या ठिकाणी जाऊन जिओ टैगद्वारे फोटो आणि व्हिडीओ शूट केले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील आणि तहसीलदार गायकवाड यांना फोटो-व्हिडीओ पाठवून कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. कार्यवाहीच्या मागणीला दुसरा दिवस उजाडला असताना देखील आद्यपही या मुरुमाच्या गौण खनिज उत्खनन संदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने गौण खनिज काढणाऱ्यांना महाउसळ अधिकाऱ्यांनी खुलं छुट दिली कि काय..? असा प्रश्न पुढे येऊ लागल्याने आज दि.१६ जानेवारी रोजी मोहम्मद इम्तियाज उर्फ बाबा खान यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून याबाबत तक्रार दिली आहे.
