
नांदेड| यावर्षीचा दिवंगत सुधाकरराव डोईफोडे जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात विचारवंत, माजी कुलगुरु डॉ.सुधीर गव्हाणे यांना तर राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार प्रख्यात वृत्त निवेदक विलास बडे यांना जाहीर झाला आहे.


जेष्ठ समाजवादी नेते व विचारवंत, प्रजावाणीचे संपादक सुधाकरराव डोईफोडे यांच्या स्मृती प्रित्यार्थ मागील आठ वर्षांपासून विचारवंत, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, विकासात्मक कार्यात स्वतःला झोकुन देणार्या एका व्यक्तीचा जीवन गौरव पुरस्कार देवून तर पत्रकारिता क्षेत्रात सामाजिक बांधिलकी लक्षात घेवून उल्लेखनिय कार्य करणार्या तरुण पत्रकारांना राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार दिला जातो.


यंदाच्या जीवन गौरव पुरस्कारासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु, प्रख्यात विचारवंत, साहित्यिक, लेखक, ज्येष्ठ पत्रकार डॉ.सुधीर गव्हाणे यांची तर राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कारासाठी आयबीएन लोकमतचे वृत्त निवेदक विलास बडे यांची निवड करण्यात आली आहे.


हा पुरस्कार प्रदान सोहळा सुधाकरराव डोईफोडे यांच्या स्मृती दिनी दि.22 जानेवारी, 2023 रोजी सायंकाळी 4.00 वाजता नरहर कुरुंदकर सभागृह, पीपल्स कॉलेज परिसर येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली व शंतनु डोईफोडे संपादक प्रजावाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे, असे समितीचे सचिव लक्ष्मण शिंदे व उपाध्यक्ष सुर्यकांत वाणी यांनी जाहीर केले आहे. सुधाकरराव डोईफोडे पुरस्कार समितीने योग्य व्यक्तीची निवड केल्याबद्दलचा पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ.व्यंकटेश काब्दे, तर सी.ए.डॉ.प्रवीण पाटील, धनंजय डोईफोडे व इतर मान्यवरांनी व्यक्त केला.

या जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यास जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे सचिव प्रो.डॉ.लक्ष्मण शिंदे व सुर्यकांत वाणी, डॉ.बालाजी कोम्पलवार, डॉ. अशोक सिध्देवाड, महेश शुक्ल, अॅड.कॉ.प्रदिप नागापूरकर, कॉ.विजय गाभणे, कॉ.के.के.जामकर, बालाजी टिमकीकर, डॉ.पूष्पा कोकीळ आदींनी केले आहे.
