
अर्धापूर, निळकंठ मदने| जगात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेनंतर नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर कामठा बु ता.अर्धापूर येथील खंडेरायाची यात्रा प्रसिद्ध व ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. चार जिल्ह्यातून सर्व जाती धर्माचे भाविक मोठ्या संख्येने येतात आणि राष्ट्रीय सलोखा, ऐक्य जोपासणारे चित्र आपणास पहावयास मिळते.


कामठा बु येथील यात्रेस 19 जानेवारी रोजी प्रारंभ होत आहे. या दिवशी खंडेरायाच्या आरत्या व सबीना निघणार आहे. 20 जानेवारी रोजी शुक्रवारी दुपारी एक वाजता भव्य असा पालखी सोहळा निघणार आहे. दि 21 व 22 रोजी भव्य शंकर पट स्पर्धा आयोजित केली आहे. दि 23 रोजी जंगी कुस्त्यांच्या सामने होणार आहेत.


येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात पालखीचा प्रारंभ होतो. मिरवणुकीत ढोल ताशाच्या गजरात खंडोबाचे वारू चाबकाचे वार हातावर पायावर घेत भाविक टिपरे,बताशाचा प्रसाद व शाल पालखीवर पांघरून दर्शन घेतात. दरम्यान गावाच्या मध्यभागी बुरुजा जवळ दिगंबर हैबतराव जंगे हा भाविक नंग्या तलवारीचे पाच वार स्वतःच्या उघड्या पाठीवर व पोटावर घेतो. हे रोमहर्षक दृश्य पाहण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी होत असते. शेवटी मंदिराजवळ भाविक लोटांगण घेतात व त्यावरून पालखी मंदिरात जाऊन विसर्जित होते.


यात्रेच्या तयारीसाठी ग्रामपंचायत कडून साफसफाई, विद्युत रोषणाई व पाणीपुरवठ्याची व्यवस्था सरपंच सौ दुर्गा विश्वनाथ दासे व उपसरपंच रणजितसिंघ कामठेकर व ग्रामसेवक डी.बी. आगलावे व आदी सदस्यांनी तयारी केली आहे. या यात्रेत सर्व भक्तांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.
