
नांदेड| महात्मा गांधी मिशन संचलित पत्रकारिता व माध्यमशास्त्र महाविद्यालयात दि. 20 जानेवारी रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन महात्मा गांधी मिशनचे संस्थापक अध्यक्ष कमलकिशोर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त प्रसार माध्यमांची भुमिका या विषयावर परिषद संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. गीता लाठकर असणार आहेत. तर कार्यक्रमाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई दूरदर्शनचे उपसंचालक डॉ. नरेंद्रकुमार विसपुते उपस्थित राहणार आहेत. तर मुंबई येथील एबीपी माझाच्या निवेदिका वृषाली यादव-सारंग मार्गदर्शन करणार आहेत.

या परिषदेसाठी नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, स्वारातीम विद्यापीठ माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, माध्यमशास्त्र संकुलाचे प्रा. डॉ. दीपक शिंदे, ज्येष्ठ साहित्यीक देवीदास फुलारी आदींची उपस्थिती राहणार आहे.

या परिषदेमध्ये 21व्या शतकातील वृत्तपत्राचे बदलते स्वरूप, 21 व्या शतकातील नव माध्यमांच्या दशा व दिशा, स्वातंत्र्योत्तर काळातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांची भुमिका या व आदी विषयांवर चर्चासत्र देखील संपन्न होणार आहे. या परिषदेसाठी इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियातील पत्रकार व पत्रकारितेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांनी केले आहे.

