
नांदेड| 05 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवार 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक शाखेच्यावतीने मत नोंदविण्यासाठी मतदारांना आवश्यक त्या सुचना निर्गमीत केल्या आहेत.

मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी सूचना
मतदान करण्यासाठी केवळ मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळ्या रंगाचा स्केचपेनचाच वापर करावा. याशिवाय इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन यांचा वापर करु नये. ज्या उमेदवारास तुम्ही पहिला पसंतीक्रम देण्यासाठी निवडले आहे, त्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम (Order of Preference) असे नमूद केलेल्या रकान्यात “1” हा अंक नमूद करुन मतदान करावे.

निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या एका पेक्षा जास्त असेल तरी “1” हा अंक केवळ एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद करावा. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या कितीही असली तरी तुम्हाला जेवढे उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तेवढे पसंतीक्रम नोंदविता येतील. उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर तुमचा पुढील पसंतीक्रम 2, 3, 4 इत्यादी अंक तुमच्या पसंतीक्रमानुसार “पसंतीक्रम” (Order of Preference) या स्तंभामध्ये दर्शवा.

कोणत्याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद करावा. एकच अंक एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर नमूद करु नये. पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शविला जाईल. उदा. 1,2,3 इत्यादी आणि तो एक, दोन, तीन, इत्यादी असा शब्दात दर्शवू नये. अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरुपात जसे 1,2,3 इत्यादी किंवा रोमन स्वरुपातील I,II,III इत्यादी किंवा संविधानाच्या 8 व्या अनुसूचितील भारतीय भाषेतील अंकांच्या स्वरूपात नोंदविता येतील. मतपत्रिकेवर तुमची स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे किंवा नाव किंवा कोणतेही शब्द नमूद करु नये.

तसेच अंगठ्याचा ठसा उमटवू नये. तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर (√) किंवा (×) अशी खुण करु नये, अशी मतपत्रिका बाद ठरेल. तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी उमेदवारांपैकी एकाच्या नावासमोर “1” हा अंक नमूद करुन तुमचा पहिला पसंतीक्रम दर्शविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम हे ऐच्छिक स्वरुपाचे असून ते अनिवार्य नाहीत. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदारांनी मतदान करतांना या सूचनांचे पालन करुन आपले मतदान अवैध ठरणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी 5- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ यांनी केले आहे.

