
हदगाव /तामसा, गजानन जिदेवार। तामसा येथील बारालिंग देवस्थानातील भाजी भाकरीच्या महाप्रसादाचा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला असून दोन लाख भाविकांनी भाजी भाकरीचा महाप्रसादाचा आस्वाद घेतला. यावर्षी दीडशे क्विंटल भाजी शिजवण्यात आली होती. तर सव्वाशे क्विंटल ज्वारीच्या भाकरीचा महाप्रसाद रांगेतून वाटप करण्यात आला. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर यावर्षी प्रथमच सुरू झालेल्या महाप्रसादाला भाविकांनी अलोट गर्दी केली होती.


सर्व धर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोखा जोपासण्याचे ग्रामीण भागातील अस्सल उदाहरण म्हणजे तामसा येथील बारालिंग देवस्थानातील भाजी भाकरीचा महाप्रसादाचा सोहळा मानला जातो. बारालिंग महादेव मंदिरात सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी येथील पुजारी महादलींग महाराज कंठाळे यांचे पूर्वजांनी मकर संक्रातीचे करिदिनी भाजी-भाकरीचा महाप्रसादाला सुरुवात केली होती. हीच परंपरा तामसेकरांनी आज तागायत चालू ठेवली आहे. दि. 16 रोजी सोमवारी सकाळी बारालिंग महादेव मंदिराचे पुजारी रेवन महाराज कंठाळे यांचे हस्ते महाअभिषेक, महापूजा संपन्न झाली. त्यानंतर दुपारी बारा वाजता भाजी-भाकरीच्या महाप्रसादाचे वाटपाला सुरुवात झाली.


महाप्रसादासाठी पंचक्रोशीतील नव्हे तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे दोन लाखाच्यावर भाविकांचा जनसागर उसळला होता. मंदिर परिसरात धार्मिक व भक्तिमय वातावरणाचा पूर ओसंडून वाहत होता. मोठया श्रद्धेने, भक्तीभावाने बारालिंग महादेवाचे दर्शन घेऊन स्वतःचा कमीपणा न दाखवता रांगेत उभे राहून भाविकांनी भाजीभाकरी महाप्रसादाचा आनंद लुटला. धार्मिक भावनेने ओतप्रोत भरलेल्या नैसर्गिक आणि आरोग्याला पोषक अशी समिश्र भाजीभाकरी खाऊन स्वतःला धन्य झाल्याचा आनंद अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावर्षी दीडशे क्विंटल भाजी, तर सव्वाशे क्विंटल ज्वारीच्या भाकरीचा महाप्रसाद बनवण्यात आला होता. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप चालू होते.


तर दुसरीकडे व्हीआयपी पास म्हणून शंभर रुपये टोकन घेऊन भाजीचा डब्बा, भाकरी व पाण्याची बॉटल देण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर बारालिंग देवस्थानातील भाजी भाकरीच्या महाप्रसादाला प्रचंड गर्दी झाल्याने यावर्षी शेवटी शेवटी भाजी भाकरीचा महाप्रसाद संपून गेल्याने हजारो भाविकांना महाप्रसादापासून वंचित रहावे लागले हे मात्र निश्चित!

बारालिंग देवस्थानात संपन्न झालेल्या भाजी भाकरीच्या महाप्रसादासाठी यावर्षी सुमारे दोन लाखाच्या वर भाविकांचा जनसागर उसळला होता. यात्रेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तामसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे यांनी भोकर, अर्धापूर, हिमायतनगर, हदगाव, मनाठा व तामसा त्याचबरोबर आरसीएफ ची ए प्लाटून पथकाच्या २० जवनाची तुकडीला पाचारण करण्यात आले होते. एकूण ६० ते ७० पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत कुठलीही अनुचित प्रकार न घडता यात्रा अत्यंत शांततेत पार पडल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता पी.पी. साखरे आणि यंत्रचालक सचिन सोनसळे यांनी दिवसभर सुरळीत वीज पुरवठा खंडित नव्हता चालू ठेवला होता.

बारालिंग देवस्थानातील भाजी भाकरीच्या महाप्रसादासाठी अनेक राजकीय मंडळी सह शासकीय कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर, बाबुराव कदम कोहळीकर, बाबुराव पवार पाथरडकर, कृष्णा पाटील आष्टीकर, गंगाधर पाटील चाभरेकर यांचेसह अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तहसीलदार जीवराज डापकर, हदगाव पंचायत समितीचे शाखा अभियंता दयानंद शिंदे, ग्रामविकास अधिकारी आनंद शेळके, यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते. यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी भाजी भाकर महाप्रसाद वाटपाचे कार्य केले. तसेच हातावर भाकर भाजी घेऊन महाप्रसादाचा आस्वाद घेऊन स्वतःला धन्यता मानले.

भाजी भाकरीचा महाप्रसाद कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिर कमिटीचे अध्यक्ष संतोष निलावार, अनंता भोपळे, गणपत हनवते, रमेश घंटालवार, सरपंच बालाजी महाजन, अशोक कोटगिरवार, पंडित पाटील, पत्रकार नंदकिशोर सोनमनकर , संभाजी कल्याणे, प्रकाश पवार पाथरडकर, भगवान पवार पाथरडकर, प्रदीप बंडेवार, प्रभाकर संगणवार, प्रभाकर महाजन, दिलीप बास्टेवाड, देवानंद चव्हाण, माधव नरेवाड, सचिन बंडेवार, विश्वंभर कोठुळे, सुभाष धरमुरे, केदु आचारी यांचे सह सायक्लो हात कामाला लागले होते.