
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातील नगरपंचायत अंतर्गत पंचवार्षिक काळात झालेल्या इदगाह मैदान बांधकामात लाखोंच्या निधीत आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. धार्मीक स्थळाच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कार्यवाही करावी अन्यथा शहरातील सामाजिक कार्यकर्ते बाबा खान, आशिष सकवान, सरदार खान, उदय देशपांडे यांच्यासह सर्वपक्षीत कार्यकर्ते उपोषणाला बसण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. शहरात झालेल्या इतरही धार्मिक स्थळाच्या बांधकामात किती हेराफेरी झाली याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत विकासप्रेमी जनतेतून व्यक्त केली जात आहे.


हिमायतनगर शहराला मागील ७ वर्षांपूर्वी नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. यामुळे शहराच्या कायापालट होऊन नागरी सुविधा मिळतील अशी रास्त अपेक्षा जनतेला होती. मात्र मागील पंचवार्षिक काळात शेकडो कोटीची विकास कामे झाली. परंतु विकास कामाच्या नावाखाली नगरपंचायतीच्या तत्कालीन लोकप्रतिनिधी, अभियंता आणि तत्कालीन मुख्यधिकाऱ्यांनी गुत्तेदारांशी संगमात करून स्वतःचा विकास करून घेत शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. त्यातील एक उदाहरण म्हणजे ईदगाह मैदानाच्या बांधकामावरून पुढे आले आहे. तर अन्य झालेल्या विकास कामाच्या बाबतीतही हीच परिस्थिती असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते आहे. याबाबतीतही सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवून नगरपंचायतीला शासनाने किती निधी दिला आणि किती निधी अंदाजपत्रकाप्रमाणे समबंधित विकास कामावर झाला याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे उघड होणे गरजेचे आहे.


हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत सन 2017 काळात गणेशवाडी परिसरातील नगरोत्थान योजने अंतर्गत इदगाह मैदान बांधकामासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला. त्यानूसार इदगाह मैदान व ओट्याचे बांधकाम करण्यात आले होते. त्याचे रितसर देयके संबंधित गुत्तेदाराला देण्यात आले होते. परंतु नगरपंचायतचे काही अधिकारी कर्मचारी व इतर लोकप्रतिनिधींनी संगनमत करून पुर्वीच झालेले इदगाह मैदान व ओट्याचे बांधकाम पुन्हा दलितेत्तर योजना असल्याचे भासवून सन 2018/2019 मध्ये म्हणणे दुसऱ्या टर्ममधील लोकप्रतिनिधींच्या काळात शासन व जनतेची दिशाभूल व फसवणूक केली गेली आहे.


शासनाला केलेल्या कामाला दाखवून नव्याने इदगाह मैदानाच्या जागेवर कोणतेही अतिरिक्त बांधकाम करण्याची आवश्यकता नसताना शासनाकडून एकूण 43 लक्ष 91 हजार 686 एवढा मोठा निधी मंजूर करून घेतला. त्यानंतर प्रशासक लागू झाल्यावर हा निधी सबंधित गुतेदाराला परस्पर देऊन अपहार केला असल्याचे आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हण्टले आहे.

तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व संबंधित नगरपंचायत हिमायतनगर यांना चौकशीचे आदेश मिळाले, परंत्तू गैरव्यवहारांची चौकशी थातुर माथूर करून धार्मिक स्थळाच्या नावाखाली करण्यात आलेल्या गैरव्यवहाराचे प्रकरण ऍक्सिस बांधकाम असल्याचे दाखवून दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते मोहम्मद इम्तियाज यांनी केला असून, या प्रकरणी सबंधित अपहार कर्त्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी त्यांनी संबंधित विभागास पत्र देऊन केली आहे. दरम्यान याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर धार्मिक स्थळाच्या नावाखाली झालेल्या अपहाराची चौकशी होऊन संबंधितांना जेलमध्ये पाठवावे आणि संबंधित गुत्तेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी धरून हिमायतनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपोषणाला बसण्याची तयारी करत आहेत. याबाबतची माहिती त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली असून, यासाठी अधिकृत पत्र तहसीलदार यांना देणार असल्याचे सांगितले आहे.
