
नांदेड| बायको आणि मुले हैदराबाद येथून नांदेडला परत येत नसल्याने एका तरुणाने पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन करून खळबळ उडवून दिली आहे. हि घटना नांदेड शहरामध्ये असलेल्या शोभा नगर भागातील स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील पाण्याच्या टाकीवर सकाळी ७ वाजता घडली आहे. हा प्रकार पाहण्यासाठी परिसरात मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी जमली होती.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुले सासरवाडीला निघून गेल्यानंतर बेभान झालेल्या एका तरुणांने शुक्रवारी दि.२० रोजी नांदेड शहरातील शोभा नगर येथील पाण्याच्या जलकुंभावर चढून आत्महत्येचा इशारा दिला. शोले स्टाईल आत्महत्येचा हा ड्रामा सकाळी ७ वाजल्या पासून तब्बल पाच तास सुरू होता. पाण्याच्या टाकीवर चढून तो युवक पत्नी आणि मुलांना आणण्याची मागणी करत होता. त्यानंतर काही नातलग आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या युवकास खाली उतरण्याची विनंती केली पण तो बायको आणि मुले येईपर्यंत उतरणार नाही, असे म्हणत होता.


त्यानंतर पोलिस आणि महानगर पालिका प्रशासनाने तातडीने धाव घेऊन त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले. तब्बल पाच तासाचे अथक परिश्रमानंतर त्या तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पत्नी माहेरून येण्यास होकार दिल्यानंतरच तो तरुण खाली उतरण्यासाठी तयार झाल्याचे सांगण्यात आले. हा शोले स्टाइल खळबळजनक प्रकार शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरु होता. पाण्याच्या टाकीवर चढलेला हा तरुण नांदेड शहरातील अंबानगर येथील देवदास येरगे असल्याचे सांगण्यात आले आहे.

