
तामसा/हदगाव, गजानन जिदेवार। तामसा येथील आठवडी बाजाराची चार एकर जागा एका खाजगी व्यक्तीने महसूल यंत्रणेतील शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून हडपण्याचा डाव रचला असल्याची गंभीर तक्रार सरपंच बालाजी महाजन यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे दि. 17 रोजी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या हदगाव भेटी दरम्यान केली आहे.


तामसा येथील आठवडी बाजार ग्रामपंचायतच्या देखरेखीखाली 60 वर्षापासून भरत असतो. पण सदर मालमत्तेवर येथील मोहम्मद खान उर्फ जमशेद खान व कुटुंबातील अकरा व्यक्तीच्या नावाने सदरील जागा आपल्या वडिलोपार्जित असून मिळकतीच्या हक्कासाठी विविध शासकीय कार्यालयांत अर्जबाजारी चालविले आहेत. आठवडी बाजाराच्या जागेबाबत हदगाव उपविभागीय अधिकाऱ्यांच्या न्यायालयाने नुकताच अर्जदाराचा हक्क मान्य करणारा निकाल दिला आहे.


हा निकाल एकतर्फी असून उपविभागीय अधिकारी न्यायालयाने ग्रामपंचायतला निकालापूर्वी बाजू ऐकण्या संदर्भात कोणतीही नोटीस दिली नाही किंवा ग्रामपंचायतीचे म्हणणे ऐकून घेतले नसल्याचे सांगण्यात आले. वास्तविक पाहता यापूर्वी उपविभागीय अधिकारी हदगाव न्यायालयाने आठवडी बाजाराच्या वारसा बाबतचा दावा खोडून काढणारा निकाल दिला असल्याचे सरपंच महाजन यांनी तक्रारीत नमूद केले. एकाच प्रकरणी परस्परविरोधी दोन निकाल देण्याची उपविभागीय अधिकारी न्यायालयाची भूमिका समजण्यापलीकडे आहे. याबाबत हदगाव तहसील कार्यालयाची भूमिका सादर केलेल्या अहवालाबाबत संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.


तामसा आठवडी बाजाराची 4 एकर जागा हडप करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून चालवलेले प्रयत्न चुकीचे व गंभीर आहेत. हे प्रकरण औरंगाबाद येथील विभागीय भुमिअभिलेख कार्यालयात नेल्यानंतर जागेबाबाचा खाजगी दावा फेटाळून अपीलही अमान्य झाले होते. आठवडी बाजार जागेचा वाद नांदेडच्या दिवाणी न्यायालयात प्रलंबित असतानाही उपविभागीय अधिकाऱ्याने आठवडी बाजार जागेवर खाजगी हक्क मान्य करणारा निर्णय चुकीचा मानला जात आहे.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तामसा येथील आठवडी बाजारच्या बाबतीत सार्वजनिक हीत लक्षात घेऊन या प्रकारामध्ये गुंतलेल्या कथित शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांकडे याबाबतची तक्रार देताना उपविभागीय अधिकारी ब्रिजेशकुमार पाटील व तहसीलदार जीवराज डापकर यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी राऊत याप्रकरणी कोणती भूमिका घेतात, याकडे तामसा येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे. यावेळी सरपंच बालाजी महाजन, उपसरपंच प्रतिनिधी खाजा भाई, ग्रामविकास अधिकारी आनंद शेळके, माजी सरपंच माधव नारेवाड, अशोक पाटील कोडगिरवार, शिवराज वारकड, ज्ञानेश्वर कोडगिरवार, साहेबराव देशमुख, आकाश जाधव यांच्यासह मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते.
