
नांदेड| खरीप हंगाम 2022 मध्ये पेरणीसाठी शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची मागणी होती. शेतकऱ्या कडून मागणी असलेल्या DAP, MOP, 10:26:26, 12:32:16, यूरिया या मुख्य खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत होता. त्याचाच गैरफायदा घेत रासायनिक खत कंपन्या व घाऊक विक्रेते यांच्या संगनमताने मागणी असलेल्या मुख्य रासायनिक खतासोबत शेतकऱ्याकडून मागणी नसलेल्या नॅनो युरिया, कंपोस्ट, मायक्रोनुट्रीयंट, वाटर सोलूबल खते इत्यादीचे मुख्य खतासोबत लिंकिंग करण्यात आले होते.

जिल्ह्यात तालुकानिहाय खतांचे समान वाटप करण्याची जबाबदारी कृषि विकास अधिकाऱ्यांची असताना नांदेड मधील मोठे ठराविक घाऊक विक्रेते व रासायनिक खत कंपन्या त्यांच्या पद्धतीने कृषि विकास अधिकारी यांना डावलून फक्त लिंकिंग चा माल घेणान्या विक्रेत्यानाच मोठ्या प्रमाणात खतांचे वाटप करत होते. हे सर्व चालू असताना यावर्षीच्या खरीप हंगामात लिंकिंग च्या तक्रारी येवून सुद्धा कृषि विभागाने फक्त बघ्याच्या भूमिका घेतली होती.

आजच्या परिस्थितीत रबी हंगामाची पेरणी संपून सुद्धा यूरिया या खतासोबत इतर गरज नसलेली खते घेण्याची बळजबरी लिंकिंग च्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी मागणी नसलेली इतर खते मुख्य खतासोबत शेतकऱ्यांना दिल्याने व त्याबाबत शेतकऱ्याकडून तक्रारी झाल्याने एन खरीप व रबी हंगामात काही किरकोळ विक्रेत्यांचे खत विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे किरकोळ खत विक्रेत्याना आर्थिक अडचणीसोबतच कायदेशीर कार्यवाही ची भीती सुद्धा निर्माण झाली आहे.

त्यातच काही किरकोळ विक्रेत्यानी लिंकिंग च्या त्रासाला कंटाळून खते न विकण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडून मागणी असलेली मुख्य रासायनिक खते सुद्धा मागविण्यासाठी किरकोळ विक्रेते उत्सुक नाहीत. याचा परिणाम येणाऱ्या पुढील हंगामात शेतकऱ्यांना खत पुरवठा करण्यावर होऊ शकतो. लिंकिंग च्या कारणाने रसायनिक खते वितरणात अडचणी निर्माण झाल्यास त्याला कृषि विभागाचे प्रशासन सर्वस्वी त्याला जबाबदार असणार आहे.

तरी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच तत्काळ यासंबंधी योग्य निर्णय घेऊन रासायनिक खतांचा लिंकिंग विरहित व सुरळीत पुरवठा करण्यात यावा अन्यथा अर्धापूर तालुक्यात “रासायनिक खते विक्री बंद” आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी या मागणीचे निवेदन सर्व कृषी निविष्ठा विक्रेते तालुका अर्धापूर च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी सौ.अनुराधा ढालकरी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी संघटनेचे आशिष सावंत, संतोष मगर, सुनील बोबडे, आरिफ लुकडे, संदीप जैन, प्रवीण जडे, मारोतराव भोकरकर, उनकेश्वर नांदेडकर, सचिन डांगे, विनोद कस्तुरे, गजानन डोंगरे, अनिल मगर, केशव हटेकर, विशाल बारसे, मनमथ मुस्तापुरे, अक्षय गुंडले, मनमत गवळी, कृष्ण शिंदे, अशोक शिंदे, साई कल्याणकर, भुजाजी राजेगोरे आदी उपस्थित होते.

