
हिमायतनगर,अनिल मादसवार। तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते व विविध विकास कामे सुरू आहेत यातील बहुतांश कामे ही अंदाजपत्रकाला बदल देऊन केली जात आहेत त्यामुळे शासनाच्या विकासाचा उद्देश धुळीत मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळते आहे असाच काहीसा प्रकार हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा पासून ते जवळगाव कमानी पर्यंत डांबरीकरणाचे काम नांदेडच्या राजकीय वरदहस्त असलेल्या ठेकेदारामार्फत केले जात आहे. या रस्त्याच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी. आणि ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावी अशी मागणी राम गुंडेकर यांनी केली आहे.

सदरील रस्त्यासाठी सिआरफ योजनेतुन २६३ वर अंदाजीत तीन कोटी रूपये खर्च करून डांबरी रस्ता व सिसी रस्ता करण्याचे काम सुरू आहे. सदरचे काम करतांना अंदाज पत्रकात नमुद बाबी प्रमाणे विशाल कंस्ट्रक्शन कंपनी हदगाव काम करीत नसल्याचे दिसुन येते. या रस्त्यावर असलेल्या पुलाच्या कामातही मोठ्या प्रमाणात अनियमित्ता झाली असून, सदरील काम करताना परिसरातील शेतकऱ्यांनी अडवून पुलाच काम बंद पाडले होते. त्यानंतर यात सुधारणा करण्याचे आश्वासन देऊन पुन्हा मनमानी पद्धतीने पुल करण्यात आला आहे.

सध्याच्या घडीला सिमेंट रस्त्याचे काम सुरू असून नाल्याची रेती, सिमेंटचे कमी प्रमाण, कमी साईजचा गज तोही सिमेंट रस्ता करतांना लावला जात नाही. एका मिक्सरच्या यंत्रात पसतीस पोते सिमेंट वापरण्याचे असतांना केवळ पंचवीस पोते वापरला जात असल्याचे लक्षात येते आहे. सोनारी ते जवळगाव दरम्यान करण्यात आलेल्या डांबरीकरण च्या रस्त्यातही मोठ्या प्रमाणात अनियमित्ता असून एका लेव्हलने रस्ता नसल्याने ऊस वाहतुक करणारी अवजड वाहने ये जा करताना एका बाजूला झोके देत वाहने चालवावी लागत आहेत.

याचं रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गावरून वाहनांची ये जा वाढुन अशा निकृष्ट कामामुळे रस्त्याची काही दिवसातच चाळण होणार आहे. ठाकुर यांचे शेताजवळ झालेल्या पुलाला तडे गेले आहेत, पुलाची भिंत फोडुन पुन्हा करण्याचे उपअभियंता तुंगेनवार यांनी सांगितले असतांना अभियंता पोपुलवार गुत्तेदाराशी संगनमत करून सिमेंट पुसून घेत आहेत. परीणामी काही वर्षात पुल निकामी होवुन, वाहतुकीचा खोळंबा होणार आहे.

रस्त्याचे झालेले खोदकाम, टाकण्यात आलेला भराव, डांबरी कोट, रेल्वे भुयारी मार्गा जवळील सिमेंट रस्ता सर्व कामांची अंदाज पत्रका प्रमाणे चौकशी करून निकृष्ट नियमबाह्य काम करणाऱ्या विशाल कंस्ट्रक्शन कंपनीचे नाव काळ्या यादीत टाकावे, अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करून आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा एका निवेदनाद्वारे कट्टर शिवसैनिक राम गुंडेकर यांनी दिला आहे या निवेदनाच्या प्रती त्यांनी कार्यकारी अभियंता, कार्यालय, भोकर, सा.बां. प्रादेशिक विभाग नांदेड, सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर ता. भोकर जि.नांदेड यांना दिले आहे.

