
उस्माननगर। कौडगाव ता.लोहा येथील तरुण मजदूराने आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.


कौडगाव ता.लोहा येथील कामाजी शंकर जोंधळे (३८) हा तरुण वाजेगाव येथील वीट भट्टीवर मजूर म्हणून कामाला होता. २० जानेवारी रोजी सकाळी त्याने पत्नीला मी कामानिमित्त गावाकडे जाऊन येतो म्हणून तो गावी आला. गावातील राहत्या घराच्या लोखंडी पाईपला त्याने पांढऱ्या नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.


ही घटना शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता उघडकीस आली. या बाबतची माहिती मिळाल्यावर उस्माननगर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी. के. केंद्रे, बीट जमादार आर. एम. कानगुले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक आरोग्य केंद्र उस्माननगर येथे मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते व शवविच्छेदन करून त्यांचा नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले .


जोंधळे यांच्या मुलीचा विवाह ४ महिन्यापूर्वी झाला असून आर्थिक विवंचनेतून त्याने हे पाऊल उचलले असावे असे नातेवाईकांनी सांगितले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, २ मुली असा परिवार आहे. उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रभू केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
