Monday, June 5, 2023
Home भोकर भोकरच्या क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी : क्रीडा संकुलाच्या उभारणीचा लवकरच मुहूर्त -NNL

भोकरच्या क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी : क्रीडा संकुलाच्या उभारणीचा लवकरच मुहूर्त -NNL

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश...

by nandednewslive
0 comment

भोकर, गंगाधर पडवळे। भोकर नगर परिषद स्थापनेसासून प्रलंबित असलेल्या क्रीडाप्रेमींच्या मागणीला माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदार संघाचे आमदार अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांतून अखेर यश आले असून क्रीडा संकुलाच्या उभारणीचा लवकरच मुहूर्त निघणार आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर एस.मारावार यांनी याविषयी माहिती दिली असून सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरच्या माध्यमातून क्रीडा संकुल उभारणीच्या कामासाठी कंत्राटदारांनी आपल्या सामानाचा डेरा टाकण्यास सुरुवात केली आहे.

भोकर व तालुक्यातील विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंची वाढती संख्या,सोई,सुविधा,साधने,मैदान,अनुभवी प्रशिक्षक उपलब्धतेचा अभाव लक्षात घेता भोकर व तालुक्याचे नाव क्रीडा क्षेत्रात मोठे करणाऱ्या खेळाडूंना उपरोक्त बाबींसह क्रीडांगण आणि क्रीडासंकुल उपलब्ध करुन देणे खुप गरजेचे होते.त्यामुळे भोकर नगर परिषदेच्या स्थापनेपासून क्रीडा संकुल उभारणीची मागणी अनेक खेळाडू व क्रीडाप्रेमींतून होत होती.याच मागणीच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नगर परिषद स्थापनेच्या पहिल्या पर्वात क्रीडा संकुल मंजूर करुन घेतले होते.तसेच शहराबाहेरील मुदखेड रोड लगत सदरील क्रीडा संकुल उभारणीसाठी जागा निश्चित करण्यात आली होती.नव्हे तर त्या ठिकाणी उभारणीस्तव नारळ ही फुटले होते.परंतू ती जागा वादातीत निघाल्याने क्रीडा संकुल उभारणीला ग्रहण लागले.

तेंव्हासांपासून विविध क्रीडा संघटना,खेळाडू, क्रीडाप्रेंमीची क्रीडा संकुल उभारणीसाठीची मागणी होती. तालुक्यातून विविध क्रीडा प्रकार,खेळांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू तयार होत आहेत हे पाहता क्रीडा संकुल उपलब्धतेची नितांत गरज लक्षात घेऊन अखेर क्रीडा संकुलास मान्यता मिळाली असल्याने भोकर तालुक्यातील क्रीडापट्टूंना यासाठी आता अधिकची प्रतीक्षा करावी लागणार नाही.कारण क्रीडा संकुल उभारणीसाठीचा मुहूर्त लवकर निघणार आहे.

सन २०२० मध्ये माझी मुख्यमंत्री तथा तत्कालीन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांतून भोकर येथे क्रीडा संकुल उभारणीसाठी आराखडा तयार करण्यात येऊन मंजूरीसाठी ठेवण्यात आला.पुढे जून २०२२ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी विपीन इटनकर,जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर एस.मारावार, उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसिलदार भरत सुर्यवंशी यांसह आदी अधिकाऱ्यांनी भोकर शहरालगत असलेल्या किनवट रोडवरील जिल्हा परिषद हायस्कूल परिसरातील मोकळ्या जागेत क्रीडा संकुल उभारणीसाठीची जागा निश्चित केली व त्यास मंजूरी ही मिळाली.

जवळपास ४ एकर क्षेत्रावर ५ कोटी रुपये खर्चाचे हे क्रीडा संकुल उभारले जाणार असून यासाठी १ कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरकडे वर्ग करण्यात आले आहेत,अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर एस.मारावार यांनी दिली आहे.

तसेच सदरील क्रीडा संकुलात इमारत अंतर्गत व बाह्य क्रीडांगणांचा समावेश असून यात बॅटमिंटन हॉल,बास्केट बॉल,जिमनॅस्टिक,ज्यूदो कराटे,पॉवर लिफ्टींगसह बाह्य मैदानात २०० मिटरचा ट्रॅक यांसह आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.सदरील क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी नुकतीच जागेची साफसफाई करण्यात आली असून कंत्राटदार बांधकाम साहित्य ठेवण्याचा डेरा उभारत आहे.

तालुकास्तरावरील हे क्रीडा संकुल उत्तम दर्जाचे खेळाडू घडविल या दिशेने काम करु – तहसिलदार राजेश लांडगे

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तथा भोकर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांतून तालुकास्तरावर भव्य जागेत व मोठ्या निधीचे अद्यावत असे हे क्रीडा संकुल साकारत आहे.शहर व तालुक्यातील विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना या क्रीडा संकुलात सराव‌ करण्यासाठी सोयी,सुविधा,साधने व मैदान उपलब्ध होणार आहे.

त्यामळे भोकर तालुक्यातील ग्रामीण खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात नवी दिशा मिळणार आहे.म्हणून सदरील क्रीडा संकुल उभारताना सर्व खेळाडू, क्रीडाप्रेमींसह आम्ही देखील लक्ष घालू व हे क्रीडा संकुल उत्तम दर्जाचे खेळाडू घडविल या दिशेने काम करु,असा विश्वास भोकर तहसिलचे तहसिलदार तथा क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अध्यक्ष राजेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

विधान परिषद निवडणूक आचारसंहिता संपल्यावर उभारणी मुहूर्ताची शक्यता ? होऊ घातलेल्या राज्य विधान परिषद निवडणूक अनुषंगाने भोकर तालुका हा औरंगाबाद शिक्षक मतदार संघात येतो. त्यामुळे येथे आदर्श आचारसंहिता लागू असल्याने भोकर येथील सदरील क्रीडा संकुलाच्या उभारणी शुभारंभास राजकीय,लोकप्रतिनिधींना उपस्थित राहता येणार नाही. परंतू प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते विकासात्मक कामांचा शुभारंभ करता येऊ शकते.

असे असले तरी ज्यांच्या प्रयत्नांतून हे साकारणार आहे त्या लोकप्रतिनिधींची उपस्थिती असणे अत्यावश्यक आहे.आणि आचारसंहितेमुळे त्यांच्या हस्ते भुमिपुजन होणे शक्य नसल्याने हा मुहूर्त थोडा पुढे ढकलला गेला आहे.तसेच भोकर पोलीस ठाण्याची भव्य इमारत व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी निवास संकुलाचे बांधकाम पुर्णत्वास आले असून ते लोकार्पणाच्या प्रतिक्षेत आहे.

सदरील लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री आ.अशोक चव्हाण,खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते होणार असल्याचे चर्चील्या जात आहे.त्यामळे सदरील इमारतींच्या लोकार्पण सोहळ्यासोबतच या क्रीडा संकुल उभारणीच्या कामाच्या शुभारंभाचा मुहूर्त ही निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.असो..अखेर क्रीडा संकुलाच्या उभारणीचा मुहूर्त लवकरच निघणार आहे,ही बातमी मात्र खेळाडू व क्रीडा प्रेमींसाठी दिलासादायक आणि आनंदाची आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!