
नांदेड| राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून गाव तिथे पक्का रस्ता उपलब्ध करून देण्यात येत आहे. किंबहुना राष्ट्रीय महामार्गाचे जाळे सर्वदूर पसरले असताना अनेक भागात राज्य परिवहन महामंडळाची एसटी पोहचत नाही. त्यामुळे नांदेड- पेठवडज व्हाया मारताळा दहीकळंबा चिखली बारुळ ही नवीन बस सेवा सुरू करावी यासाठी चिखलीचे माजी सरपंच सचिन पाटील चिखलीकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश आले असून उद्या दिनांक 22 जानेवारी पासून या मार्गावर बस धावणार आहे.


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून राज्यासह देशभर रस्त्यांचे मोठे जाळे विणले जात आहे . राष्ट्रीय महामार्गामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील अंतर मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे किंबहुना ग्रामीण भागाला शहराशी जोडण्याचा महत्त्वकांक्षा प्रकल्प भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळातच पूर्ण होत आहे . त्यामुळे ग्रामीण भागातील शेती व्यवसायाला मोठी चालना मिळणार असून आता दळणवळणाची साधने उपलब्ध करून देण्याची गरज आहे.


या अनुषंगाने नांदेड -पेटवडज व्हाया मारतळा दहीकळंबा चिखली बारुळ अशी बस सेवा सुरू करावी. खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलीचे माजी सरपंच सचिन पाटील चिखलीकर यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा केला. सचिन पाटील चिखलीकर यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे अखेर राज्य परिवहन महामंडळाने या मार्गावर बस सेवा सुरू केली आहे . उद्या दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता या बस सेवेचा शुभारंभ होणार आहे.


दररोज सकाळी साडेआठ वाजता आणि दुपारी साडेतीन वाजता ही बस धावणार असून यामुळे विद्यार्थी, शेतकरी, दूध विक्रेते, शेतमजूर, नौकरदार , रुग्ण यांना मोठा फायदा होणार आहे. शिवाय वृद्ध प्रवाशांना मोफत प्रवासाची सुविधा राज्य सरकारने उपलब्ध करून दिली असल्याने त्यांनाही आरोग्याच्या सुविधा मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी याचा लाभ होणार असल्याची माहिती माजी सरपंच सचिन पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.
